पूर्व किनारपट्टीच्या विकासातून मुंबई टुरिस्ट सेंटर!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

मुंबई- शहराच्या पूर्व किनारपट्टीचा नियोजनबद्ध विकास करून क्रुझ टुरिझम, भव्य गार्डन, मरिन ड्राईव्हपेक्षा मोठा किनारा, योगासन केंद्र, कलादालन उभारले जाणार आहे. पोर्ट ट्रस्टचा कायापालट झाल्यानंतर मुंबई हे देशातील नव्हे तर जगातील प्रमुख टुरिस्ट सेंटर बनेल, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजीव भाटिया यांनी दिली.

मुंबई- शहराच्या पूर्व किनारपट्टीचा नियोजनबद्ध विकास करून क्रुझ टुरिझम, भव्य गार्डन, मरिन ड्राईव्हपेक्षा मोठा किनारा, योगासन केंद्र, कलादालन उभारले जाणार आहे. पोर्ट ट्रस्टचा कायापालट झाल्यानंतर मुंबई हे देशातील नव्हे तर जगातील प्रमुख टुरिस्ट सेंटर बनेल, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजीव भाटिया यांनी दिली.

आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीच्या विशेष चर्चासत्रात भाटिया यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नियोजनबद्ध विकासाची माहिती दिली. पूर्व किनारपट्टीवर भाऊचा धक्का येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रुझ टर्मिनल उभारण्यात येणार असून, जगभरातील बड्या क्रुझना मुंबईत येता येईल, असे भाटिया यांनी सांगितले. दर वर्षी लाखो भारतीय क्रुझ पर्यटनासाठी सिंगापूर, मियामी, अलास्का आदी देशांमध्ये जातात. मुंबईतील क्रुझ टर्मिनल भारतातील जवळपास आठ लाख क्रुझ पर्यटकांना फायदेशीर ठरेल. यातील तब्बल साडेसात लाख क्रुझ पर्यटक मुंबईत आहेत. क्रुझ पर्यटनात प्रचंड संधी असून, मुंबईला जागतिक पर्यटकांशी जोडण्यास क्रुझ टर्मिनल महत्त्वाची भूमिका बजावेल, असे भाटिया यांनी सांगितले. टर्मिनल उभारणीसाठी आवश्‍यक पर्यावरणीय मंजुरी वेळेत मिळाल्यास पुढील १० वर्षांत क्रुझ टर्मिनल पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, असा विश्‍वास भाटिया यांनी व्यक्त केला. पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयाचे अद्ययावत सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रुपांतर करण्यात येणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारी कार्यालयांसाठी स्वतंत्र कॉम्प्लेक्‍स उभारण्यात येणार आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट हे काम करील, असे भाटिया यांनी सांगितले. या कार्यक्रमाला आयएमसीचे अध्यक्ष डॉ. ललित कनोडिया आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

‘मुंबई आय’ गार्डन
मुंबई गोदीची सुमारे ९०० हेक्‍टर जमीन आहे. पूर्व किनारपट्टीच्या विकासासाठी ३८० हेक्‍टर जमीन वापरली जाणार आहे. कॉटन ग्रीन येथे १०० एकरचे गार्डन विकसित केले जाणार आहे. ‘लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई आय’ गार्डन विकसित केले जाईल. मरिन ड्राईव्हपेक्षा दुप्पट लांबीचा किनारा तयार करण्यात येणार असून यात सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक असेल.  

मुंबईतून मालवाहतूक 
देशभरात जीएसटी लागू झाल्यानंतर जकात नाके बंद झाले. जकात बंद झाल्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये पुन्हा मालवाहतूक सुरू होण्याची शक्‍यता आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदरात जाणारी व्यापारी जहाजे पुन्हा मुंबई बंदराची वाट धरतील, असे भाटिया यांनी सांगितले. यामुळे मुंबई बंदराचे उत्पन्न वाढण्याची शक्‍यता आहे.

Web Title: mumbai news Mumbai Tourist Center