रखडलेले निकाल केव्हा जाहीर करणार? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई - कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे रखडलेले निकाल कधी जाहीर करणार, याची माहिती दोन दिवसांत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला मंगळवारी (ता. 22) दिले. 

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपर तपासणीच्या नव्या पद्धतीमुळे निकालाचा बोजवारा उडाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असून पुढील शिक्षणाचे पर्याय आणि परदेशातील शिक्षण संधीबाबतही बिकट परिस्थिती निर्माण होत आहे, असे निदर्शनास आणणाऱ्या विविध याचिका विद्यार्थ्यांनी न्यायालयात केल्या आहेत. या याचिकांवर आज न्या. अनुप मोहता आणि न्या. भारती डांगे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 

विद्यापीठाच्या कार्यपद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत विद्यापीठाने तातडीने आणि चोख उपाययोजना करायला हवी, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. त्याचबरोबर तूर्तास फक्त निकाल जाहीर करण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे. पेपर तपासणीच्या तांत्रिक पद्धतीमधील त्रुटींबाबत नंतर सुनावणी घेऊ, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. विधी अभ्यासासंबंधित सीईटीची ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवल्याची माहिती आज सीईटी आयुक्तांच्या वतीने ऍड्‌. श्रीनिवास पटवर्धन यांनी न्यायालयात दिली. विद्यार्थी याचिकादार सुद्युम्न नारगोळकर याच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी ऍड्‌. मुकेश वशी यांच्यामार्फत यासंबंधी याचिका दाखल केली आहे. विद्यापीठ युद्धपातळीवर पेपर तपासणीचे काम करीत आहे, असे ऍड्‌. रॉड्रिग्ज यांनी न्यायालयाला सांगितले. शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना फक्त पेपर तपासणीचेच काम दिले आहे, आतापर्यंत सुमारे 14000 हून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले आहेत, असेही ते म्हणाले. कुलगुरू आणि कुलपती दोघेही या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेऊन आहेत, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली. 

Web Title: mumbai news mumbai university result court