पालिका इमारतीची चाळण

विष्णू सोनवणे
सोमवार, 31 जुलै 2017

शतकोत्तर रौप्यमहोत्सव सोहळ्यासाठी ड्रिलद्वारे छिद्रे

शतकोत्तर रौप्यमहोत्सव सोहळ्यासाठी ड्रिलद्वारे छिद्रे
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर मोठ्या दिमाखात उभ्या असलेल्या महापालिका मुख्यालयाच्या इमारतीला मंगळवारी (ता.1) 125 वर्षे पूर्ण होत आहेत. इमारतीच्या या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्ताने दिमाखदार सोहळा होणार आहे. त्यासाठी करण्यात येणाऱ्या विद्युत रोषणाईसाठी जागतिक वारसा म्हणून गौरव झालेल्या या इमारतीवर प्रत्येक फुटाच्या अंतरावर छिद्रे पाडण्यात आली आहेत.

व्हिक्‍टोरियन निओ गॉथिक' शैलीतील 235 फूट उंचीची ही आकर्षक इमारत देश- परदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे. या वास्तूच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त होणाऱ्या सोहळ्यासाठी इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यास हेरिटेज कमिटीने मंजुरी दिली आहे; मात्र ती कशी करणार, याबाबत माहिती हेरिटेज कमिटीला देण्यात आली नसल्याचे समजते. विद्युत रोषणाई करण्यासाठी इमारतीभोवती वीज वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. वाहिन्यांसाठी इमारतीच्या प्रत्येक फुटावर ड्रिलद्वारे छिद्रे पाडून खिळे ठोकले आहेत. त्यामुळे या इमारतीशी भावनिक नाते असलेल्या पालिकेतील अनेक अधिकारी- कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. काही वर्षात अंतर्गत फेररचनेमुळेही इमारतीचे नुकसान झाल्याचे समजते.

सोहळ्यास उद्धव, तावडेंची उपस्थिती
1 ऑगस्टला पालिका मुख्यालयाच्या आवारात सायंकाळी 6.30 वाजता इमारतीचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त होणारा विशेष कार्यक्रम आहे. कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आदी उपस्थित राहणार आहेत. समारंभाच्या सुरुवातीला अग्निशमन दलाचे संचलन होईल. पालिकेच्या इमारतीच्या लोगोचे अनावरणही या वेळी करण्यात येणार आहे.

लॉर्ड रिपन यांचे गौरवोद्गार
तत्कालिन व्हाईसरॉय लॉर्ड रिपन यांच्या हस्ते या इमारतीची कोनशिला बसवण्यात आली. त्या वेळी झालेल्या समारंभात ते म्हणाले होते, "मी बसवलेल्या कोनशिलेवर एक भव्य वास्तू उभी राहिलच; पण आपण या वास्तूतून शिक्षणाचा प्रसार, साफसफाईची उत्तम व्यवस्था, रस्ते वाहतूकविषयक सुविधांमध्ये सुधारणा आणि रोगराईचे उच्चाटन यासंबंधी कार्य करणार आहात. त्या उदात्त कार्याचे, सार्वजनिक हिताचे एक उत्तुंग स्मारक म्हणून ही वास्तू त्यात बसविलेल्या संगमरवरी पाषाणापेक्षा अधिक चिरस्थायी ठरेल.

इमारतीची वैशिष्ट्ये
-1 डिसेंबर 1885 मध्ये पालिका मुख्यालयाच्या इमारतीची कोनशिला बसवण्यात आली. तिचे वास्तुविशारद फेड्रिक विल्यम स्टिवन्स होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीचेही वास्तुविशारद तेच होते.
- इमारत बांधकामासाठी कुर्ला खाणीतील सफेद आणि निळ्या रंगाचे दगड वापरले आहेत.
- या वास्तूवरील शिल्पे पोरबंदर चुन्याच्या दगडातील आहेत.
- स्टिवन्स यांनी विजापूरच्या गोल घुमटासारखी प्रतिकृती पालिकेच्या घुमटासाठी वापरली.
- इमारतीच्या मिन्टॉन फरशी इंग्लंडमधून आणण्यात आल्या होत्या.
- इमारतीवर सोनेरी पत्रा वापरलेले नक्षीकाम आणि रंगीत काचांचा वापर करण्यात आला आहे.

अशी आहे इमारत
- "व्हिक्‍टोरियन निओ गॉथिक' शैलीचे बांधकाम
- बांधकामास सुरुवात - 25 एप्रिल 1889
- इमारतीचे काम पूर्ण - 31 जुलै1893
- बांधकामासाठी मंजूर खर्च - 11 लाख 88 हजार 82 रुपये
- इमारतीवर खर्च - 11 लाख 19 हजार 969 रुपये
- कंत्राटदार - व्यंकू बालूजी कालेवार
- बांधकामासाठी वापर - मालाड स्टोन, पोरबंदर स्टोन

Web Title: mumbai news municipal building condition