पालिकेचा तंदुरुस्तीचा संकल्प

पालिकेचा तंदुरुस्तीचा संकल्प

मुंबई - मुंबई महापालिकेचा २०१८-१९ या वर्षाचा अर्थसंकल्प या आठवड्यात स्थायी समितीसमोर सादर होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेने या अर्थसंकल्पात १२०० कोटींची वाढ होण्याची शक्‍यता आहे. अर्थसंकल्पात स्वमग्न मुलांसाठी (ऑटिस्टिक) विशेष केंद्र तयार करण्याबरोबरच मुंबईतील नागरिकांच्या तंदुरुस्तीला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच कफ परेड येथील सेंट्रल पार्कलाही विशेष स्थान मिळण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई पालिकेचा २०१७-१८ या वर्षाचा अर्थसंकल्प पूर्वीच्या अर्थसंकल्पापेक्षा तब्बल १२ हजार कोटींनी कमी केला होता. पालिकेचा अर्थसंकल्प ३७ हजार कोटींवरून २५ हजार कोटींवर आणण्यात आला. मात्र, आगामी अर्थसंकल्पात पाच ते सात टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होण्याची शक्‍यता आहे. सध्या पालिकेचे महाकाय प्रकल्प सुरू असल्याने या वर्षात नवे प्रकल्प हाती न घेण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याचे समजते. त्यात फक्त दोन ठिकाणी भूमिगत वाहनतळ उभारण्याच्या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद होण्याची शक्‍यता आहे. गोवंडीतील  शताब्दी, मुलुंडमधील अगरवाल आणि घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयाच्या विस्तारावर भर देण्यात येईल. नाहूर येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यालाही प्राधान्य देण्यात येईल. या अर्थसंकल्पात मुंबईच्या तंदुरुस्तीवरही पालिका भर देणार आहे. त्यासाठी दहिसर, अंधेरीबरोबरच पूर्व उपनगरात क्रीडा संकुल, उद्याने, मैदाने तयार करणे, नवे तरण तलाव तयार करण्यावर भर देण्यात येईल. त्याचबरोबर मुख्य जलवाहिन्यांच्या बाजूने सायकल ट्रॅक उभारण्यासाठी ३५० कोटींची तरतूद होण्याची शक्‍यता आहे. भायखळा येथे पहिले भूमिगत वाहनतळ उभारण्याची तयारी पालिकेने केली असून अन्य वर्दळीच्या ठिकाणी दुसरे वाहनतळ बांधण्याचा पालिकेचा मानस आहे.

कोस्टल रोडच्या कामाला वेग  
नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतच्या कोस्टल रोडसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, त्यातील १० ते १५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त खर्च झाला नाही. मात्र, आगामी वर्षात कोस्टल रोडसाठी दीड ते दोन हजार कोटींची तरतूद होण्याची शक्‍यता आहे. मार्च-एप्रिलमध्ये या मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. त्याचबरोबर गोरेगाव-मुलुंड या जोड रस्त्यांसाठी जादा तरतूद होण्याची शक्‍यता आहे. या मार्गाचे कामही आगामी वित्त वर्षात सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे. गारगाई, पिंजाळ हे जलप्रकल्प, जलवाहिन्या बदलणे अशी अनेक वर्षांपासून सुरू असलेली कामे पुढेही सुरू राहाणार आहे.

विकास आराखड्यालाही प्राधान्य 
मुंबईचा २०१४ ते २०३४ या २० वर्षांचा विकास आराखडा येत्या काही महिन्यात मंजूर होण्याची शक्‍यता आहे. विकास आराखड्यातील तरतुदीनुसार नवी उद्याने, मैदाने ताब्यात घेणे, रस्ते रुंदीकरण तसेच इतर आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यासाठी आगामी वर्षात भरीव तरतूद केली जाण्याची शक्‍यता आहे.

राडारोडा प्रक्रिया केंद्र 
मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. पुनर्विकासाच्या कामातून निर्माण होणाऱ्या या राडारोड्याचा प्रश्‍न मुंबईत गंभीर झाला आहे. त्यासाठी मुलुंड अथवा कांजूरमार्ग येथे पहिले राडारोडा केंद्र उभारण्यावर महापालिका भर देणार आहे. या केंद्रावर दिवसाला १२०० टन राडारोड्यावर प्रक्रिया करून त्याचा फेरवार वापर करण्यात येणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठीही पालिकेकडून तरतूद करण्यात येईल. त्याचबरोबर मुलुंड क्षेपणभूमी बंद करून देवनार क्षेपणभूमीवर कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यावर मुंबई महापालिकेकडून भर देण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com