कबड्डीसाठी पालिकेचे कोर्ट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

मुंबई - क्रिकेटपाठोपाठ फुटबॉलने मुंबईतील मैदानांचा ताबा घेतल्यावर मराठमोळ्या कबड्डी आणि खो-खोला कोपराही शिल्लक राहिलेला नाही. मैदानच उरले नसल्याने खेळाडूही कमी होऊ लागले; मात्र महापालिकेने आता पारंपरिक भारतीय खेळांनाही प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अंधेरीत खास क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून, कबड्डी आणि खो-खोचे पहिलेवहिले कोर्ट तिथे तयार करण्यात येणार आहे.

अंधेरीतील क्रीडा संकुलात फुटबॉल आणि क्रिकेटसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार करण्यात येणार आहे. क्रीडा संकुल उभारण्यासाठी महापालिका सुमारे १९ कोटी रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.

खेळांच्या मैदानांबरोबर खुली व्यायामशाळाही संकुलात बांधण्यात येणार आहे. अंधेरीनंतर दहिसरमध्येही पालिका क्रीडा संकुल उभारण्याचा विचार करत आहे. त्याचबरोबर विक्रोळी आणि शिवाजीनगरसह सात ठिकाणी तरणतलाव उभारण्यात येणार आहे. त्यातील शिवाजीनगरमध्ये तरण तलाव उभारण्यासाठी स्थायी समितीने परवानगी दिली आहे.

इतर खेळांनाही जागा 
क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी आणि खो-खोबरोबरच इतर खेळांसाठी मैदान तयार करण्यात येणार आहे. सायकल ट्रॅक बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर बास्केट बॉल आणि व्हॉलीबॉल कोर्टही बांधण्यात येणार आहे.

लहान मुलांचीही सोय
अंधेरीतील क्रीडा संकुलात लहान मुलांचाही विचार करण्यात आला आहे. तिथे लहान मुलांना खेळण्याची जागा तयार करण्यात येईल. त्याचबरोबर शोभिवंत झाडेही लावण्यात येणार आहेत.

देशी खेळांना प्रोत्साहन मिळण्यासाठी क्रीडा संकुल बांधण्याचे पालिकेने उचललेले पाऊल महत्त्वाचे आहे; मात्र ते प्रामाणिक खेळाडू आणि खेळांसाठी काम करणाऱ्या संस्थांना वापरता आले पाहिजे. कबड्डी आणि खो-खोसारख्या खेळांसाठी मैदाने उरलेली नाहीत. त्यामुळे मोठ्या स्पर्धा घेता येत नाहीत. मोठ्या स्पर्धा भरवण्याचे स्वप्न क्रीडा संकुलाच्या माध्यमातून पूर्ण व्हायला हवे.
- मनोहर इंदुलकर,(कार्याध्यक्ष, मुंबई जिल्हा कबड्डी असोसिएशन)

Web Title: mumbai news Municipal court for kabaddi