शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी शरद पवार, राहुल यांनाही भेटणार - नाना पटोले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

मुंबई - शिवसेना एनडीएचा घटकपक्ष असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटलो. ठाकरे यांच्यासह 10 नोव्हेंबरपासून यवतमाळ दौरा करणार आहे. राजकीय क्षेत्रात कोणी कोणाला भेटावे याचे बंधन नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबाबत भेटणार आहेत, असे भाजपचे खासदार नाना पटोले यांनी शुक्रवारी (ता. 27) जाहीर केले.

पटोले यांनी आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी अडीच तास चर्चा केली. पटोले यांनी काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शेतकरी विषबाधा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवरून पटोले यांनी भाजपविरोधात दंड थोपटले होते. शेतकऱ्यांना झालेल्या विषबाधेप्रकरणी त्यांनी केंद्रीय समितीमार्फत चौकशीची मागणी केली आहे. तसेच 15 नोव्हेंबरला भाजपमधील नाराजांचे पुण्यात संमेलन घेण्याचेही जाहीर केले आहे. त्यामुळेच त्यांच्या आजच्या उद्धव भेटीला महत्त्व आले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर केंद्रीय संयुक्त समिती स्थापन करण्यासाठी आपण सर्वांना भेटत असून, राहुल गांधी यांच्याबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही भेटणार असल्याचे पटोले यांनी जाहीर केले.

दोषींवर कारवाई करा!
शेतकरी विषबाधाप्रकरणी दोषींवर कारवाई केली पाहिजे. वस्तू सेवा करामुळे व्यापाऱ्यांचेही कंबरडे मोडले आहे. शेतकरीही अडचणीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच व्यापारी आणि बेरोजगारांची चळवळ उभी करणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.

Web Title: mumbai news nana patole talking