आधी मिळणार पैसे, मग खरेदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

नवी मुंबई - शालेय साहित्यांऐवजी त्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत. यात अगोदर खरेदी करून पालकांनी बिले दिल्यानंतर त्यांना पैसे मिळतात; परंतु यामुळे हातावरचे पोट असलेल्या पालकांना हे शक्‍य होत नाही. त्यामुळे आता नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने त्यांना दिलासा देण्यासाठी आधी पैसे, मग खरेदी असा प्रस्ताव तयार केला आहे. त्यावर आयुक्तांनी स्वाक्षरी केल्यानंतर तो मंजुरीसाठी येईल. पालिकेने त्याला मंजुरी दिल्यावर तो राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे याचा फायदा गरीब विद्यार्थ्यांना होणार आहे. 

नवी मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना दर वर्षी शालेय साहित्यांचे वाटप केले जात होते; मात्र तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या कंत्राटाच्या पैशाला कात्री लावल्याने गेल्या वर्षी मुलांना शालेय साहित्य मिळाले नाही. त्यानंतर राज्य सरकारने साहित्यांऐवजी त्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा आदेश काढला. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदार यांच्या मलिदा उकळण्याच्या मनसुब्यावर पाणी फेरले. सरकारच्या या निर्णयानंतर शिक्षण विभागाकडून महापालिकेच्या ३६ हजार प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांचे बॅंक खाती उघडून त्यात पैसे जमा करण्याचे काम सुरू झाले. यात आतापर्यंत १७ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी साहित्य खरेदीचे देयके महापालिकेकडे दिल्यानंतर चार कोटींपेक्षा जास्त पैसे खात्यांवर जमा केले आहेत; मात्र उर्वरित आठ हजार विद्यार्थ्यांनी आर्थिक परिस्थितीमुळे साहित्य खरेदी केली नसल्याने त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. अशा घटना टाळण्यासाठी साहित्य खरेदीनंतर पैसे देण्याऐवजी आधी पैसे मग साहित्य खरेदीचे देयके जमा करण्याबाबत शिक्षण विभाग विचार करत आहे. तसा प्रस्ताव शिक्षण मंडळाने तयार केला आहे. त्यावर रामास्वामी यांची स्वाक्षरी बाकी आहे. रामास्वामी यांच्या स्वाक्षरीनंतर हा प्रस्ताव महासभा व स्थायी समितीच्या मंजुरीसाठी पटलावर येणार आहे. दोन्ही सभागृहांत होणाऱ्या चर्चेतून ठरणारी रक्कम अंतिम समजून विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या ३६ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या आणि पुढील वर्षाचे पैसे मिळणार आहेत.  

गरीब विद्यार्थ्यांना जास्त फायदा
महापालिकेच्या शाळेत शिकणारे बहुतांश विद्यार्थी अत्यल्प उत्पन्न गट आणि दारिद्य्ररेषेखालील आहेत. त्यांच्या पालकांकडे एकाचवेळी सर्व शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पैसे नसतात. त्यामुळे गरजेनुसार साहित्य खरेदी केले जाते; मात्र आता आधी पैसे मिळणार असल्यामुळे या विद्यार्थ्यांना साहित्य खरेदी करता येणार आहे.

Web Title: mumbai news new mumbai municipal school