नववीची पुस्तके सोमवारपर्यंत उपलब्ध होणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

मुंबई - शाळा सुरू झाल्या; परंतु नववीची पाठ्यपुस्तके अद्याप बाजारात उपलब्ध झाली नसल्याने पालक संतप्त झाले आहेत. शिक्षकांसमोरही गहन प्रश्‍न उभा राहिला आहे. याबाबत "बालभारती'चे संचालक डॉ. सुनील मगर यांच्याशी संपर्क साधला असता, नववीची पुस्तके सोमवारपर्यंत उपलब्ध होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

मुंबई - शाळा सुरू झाल्या; परंतु नववीची पाठ्यपुस्तके अद्याप बाजारात उपलब्ध झाली नसल्याने पालक संतप्त झाले आहेत. शिक्षकांसमोरही गहन प्रश्‍न उभा राहिला आहे. याबाबत "बालभारती'चे संचालक डॉ. सुनील मगर यांच्याशी संपर्क साधला असता, नववीची पुस्तके सोमवारपर्यंत उपलब्ध होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नववी व सातवीची पाठ्यपुस्तके बदलली आहेत. या इयत्तांची नवी पुस्तके उन्हाळी सुटीत म्हणजे मे महिन्यातच उपलब्ध केली जावीत, अशी शिक्षकांची मागणी होती. नवीन अभ्यासक्रम असल्याने उन्हाळी सुटीत शिक्षकांचाही अभ्यास पूर्ण होईल, अशी शिक्षकांची अपेक्षा होती. मेअखेरपर्यंत सातवीची जवळपास सर्वच पुस्तके उपलब्ध झाली. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांतील धड्यांबाबत शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांना अभ्यास करता आला. मात्र, आता शाळा सुरू झाल्या तरी नववीची बहुतांश पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत.

नववी हा दहावीचा पाया समजला जात असल्याने नववीची पुस्तके कधी उपलब्ध होणार, असा प्रश्‍न शिक्षकांकडून विचारला जात आहे.
नवीन पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नव्या अभ्यासक्रमाचे शिक्षकांना प्रशिक्षण मिळणार आहे. तोपर्यंत या विद्यार्थ्यांना काय शिकवायचे, असा प्रश्‍न टीचर्स डेमोक्रेटिक फ्रंट या संस्थेचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी विचारला. या नवीन अभ्यासक्रमांच्या प्रूफ रिडिंगचे काम शिक्षकांनी फेब्रुवारी महिन्यातच पूर्ण करून दिले होते. मग एवढी दिरंगाई कशाला, असा संतप्त सवालही पंड्या यांनी विचारला.

सातवी व नववीची पुस्तके आता क्‍यूआरकोडच्या मदतीने मोबाईलवर उपलब्ध केली आहेत. या प्रक्रियेमुळे बाजारात पुस्तके येण्यास दिरंगाई झाल्याचे स्पष्टीकरण डॉ. सुनील मगर यांनी दिले. सातवीचीही उर्वरित पुस्तके सोमवारपर्यंत उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.

Web Title: mumbai news ninth books available on monday

टॅग्स