उड्डाण पुलांखाली आता नो पार्किंग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

मुंबई - सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई शहर-उपनगरांतील उड्डाण पुलांखाली वाहने उभी करण्यास मनाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्य सरकारतर्फे नुकतीच उच्च न्यायालयात देण्यात आली. न्यायालयानेही या निर्णयावर सहमती व्यक्त करत याबाबतची याचिका निकालात काढली.

मुंबई - सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई शहर-उपनगरांतील उड्डाण पुलांखाली वाहने उभी करण्यास मनाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्य सरकारतर्फे नुकतीच उच्च न्यायालयात देण्यात आली. न्यायालयानेही या निर्णयावर सहमती व्यक्त करत याबाबतची याचिका निकालात काढली.

मुंबईत पार्किंगची समस्या वाढत आहे. यापूर्वी अनेक वाहनचालक उड्डाण पुलांखालील जागेत वाहने उभी करत. यापुढे असे झाल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असे सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले.

शहर-उपनगरांतील पार्किंगच्या समस्येवर चिंता व्यक्त करणारी जनहित याचिका प्रशांत पोळेकर यांनी ऍड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत न्यायालयात केली होती. पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेक जण उड्डाण पुलांखालील जागेत वाहने उभी करतात. त्यामुळे सुरक्षेला धोका निर्माण होतो, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. त्यावरील सुनावणीदरम्यान, मुंबईला असलेला दहशतवादी कारवायांचा धोका पाहता उड्डाण पुलांखालील जागेच्या सुरक्षेवर न्यायालयानेही चिंता व्यक्त केली होती.

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर उड्डाण पुलांखाली पार्किंगला मनाई करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन होता; मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती. आता असे करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाला देण्यात आली.

सरकारच्या निर्णयावर सहमती दर्शवत राज्य सरकारने मुंबई महापालिका आणि वाहतूक विभागाच्या मदतीने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. पार्किंगच्या समस्येबाबत तक्रारी आल्यास त्यावर कारवाई करण्याचे आदेशही खंडपीठाने दिले.

Web Title: mumbai news No parking near the flight bridge