जुन्या 274 पुलांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्षच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

मुंबई - पालिकेच्या अखत्यारीतील 274 पुलांचा "स्ट्रक्‍चरल ऑडिट' अहवाल दोन वर्षे उलटूनही सादर झालेला नाही. त्यामुळे जुन्या ब्रिटिशकालीन तसेच इतर धोकादायक स्थितीतील पुलांच्या दुरुस्तीचे आणि पुनर्बांधणीचे काम रखडले आहे.

मुंबई - पालिकेच्या अखत्यारीतील 274 पुलांचा "स्ट्रक्‍चरल ऑडिट' अहवाल दोन वर्षे उलटूनही सादर झालेला नाही. त्यामुळे जुन्या ब्रिटिशकालीन तसेच इतर धोकादायक स्थितीतील पुलांच्या दुरुस्तीचे आणि पुनर्बांधणीचे काम रखडले आहे.

महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील जुन्या पुलांचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. पालिकेने या सर्व पुलांचे सर्वेक्षण करून "स्ट्रक्‍चरल ऑडिट' करण्याचा निर्णय घेतला होता. या अहवालानुसार या पुलांची दुरुस्ती, धोकादायक असेल तर पूल पाडून पुन्हा बांधकाम करण्याचे काम हाती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला; मात्र अजूनही ऑडिट अहवाल सादर झाला नसल्याने ही कामे रखडली आहेत. पुलांच्या "स्ट्रक्‍चरल ऑडिट'चे काम जवळपास पूर्ण झाले असून, अहवाल मार्चअखेरपर्यंत सादर केला जाईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले होते. अहवाल सादर झाल्याशिवाय पुलांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामे हाती घेता येणार नाहीत. त्यामुळे ही कामे रखडण्याची शक्‍यता आहे.

"स्ट्रक्‍चरल ऑडिट'च्या माध्यमातून पुलांचा डेटा तयार केला जात आहे. बहुतांश पूल ब्रिटिशकालीन असून, त्यांचे आयुर्मान संपले असतानाही या पुलांवरून वाहतूक सुरू आहे. एखादी दुर्घटना घडल्यास सर्वस्वी जबाबदारी मुंबई महापालिकेची राहील. त्यामुळे या पुलांची तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्यासाठी प्रशासनाने धोरण ठरवावे, असे पत्र तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिका आयुक्तांना पाठवले होते. त्यानंतर या पुलांचे सर्वेक्षण करून ऑडिट करण्याचा निर्णय घेतला.

मुंबईत पालिकेच्या अखत्यारीत 274 पूल आहेत. यातील काही पूल जीर्णावस्थेत आहेत. पालिकेने या सर्व पुलांची यादी तयार करून "स्ट्रक्‍चरल ऑडिट' करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी शहर आणि पूर्व, पश्‍चिम या तिन्ही विभागांतील पुलांसाठी तीन सल्लागार कंपन्या नियुक्‍त्या केल्या आहेत.

Web Title: mumbai news old bridge repairing ignore