शंभरीपार इमारतींच्या पुनर्विकासाचे तीनतेरा

शंभरीपार इमारतींच्या पुनर्विकासाचे तीनतेरा

मुंबई - गेल्या ४१ वर्षांपासून म्हाडाने पाडलेल्या इमारतींमधील भाडेकरू क्‍लस्टर डेव्हलपमेंट म्हाडानेच करावे, असे साकडे घालत आहेत. खासगी विकसकांवर त्यांचा बिलकूल भरवसा नाही. गिरणगावात शंभर वर्षांपूर्वीच्या अनेक उपकरप्राप्त चाळी आणि इमारती आहेत. कधीही कोसळतील अशी जर्जर अवस्था त्यांची झाली आहे. धोकादायक झालेल्या काही चाळी पाडण्यात आल्या; परंतु काही जमिनींचे हस्तांतरण म्हाडाने केलेले नाही. शंभर वर्षे झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचे असे तीनतेरा वाजले आहेत. म्हाडा आणि सरकारी धोरणांच्या अनास्थेचे भाडेकरू बळी ठरत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

बुधवारी हुसैनी इमारत कोसळली आणि ३३ रहिवाशांना जीव गमवावा लागला. त्यानंतर आता पुन्हा एकदा धोकादायक आणि जुन्या इमारतींचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. लालबागमधील दुमजली शिंदे चाळी म्हाडाने पुनर्विकासासाठी घेतल्या. मात्र, त्यांची जमीन अजूनही म्हाडाने पुनर्विकासासाठी हस्तांतरित केलेली नाही. डी आणि ई चाळी १९७६ मध्ये म्हाडाने पाडल्या. चाळीतील आणखी एक इमारत १९९१ मध्ये पाडली. तेथील भाडेकरू प्रतीक्षानगर, विक्रोळी, मुलुंड, ओशिवरा आदी ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. ४१ वर्षांपासून या चाळीतील रहिवासी संक्रमण शिबिरात राहत आहेत. त्यातील एक इमारत १९९१ मध्ये पाडली. अजूनही तेथील जमिनीचे भूसंपादन केली नसल्याचे रहिवासी सांगतात. या जागेचा मालक मोकळ्या झालेल्या भूखंडाचा व्यावसायिक वापर करीत आहे. म्हाडाचे मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. 

कुऱ्हाडे चाळ आणि हवा बिल्डिंग म्हाडाने पाडली आहे. तेथील नाही संक्रमण शिबीरात हलविले आहे. चिंचपोकळीमधील मोतीवानी चाळ ही दुमजली इमारत २००७ मध्ये म्हाडाने पाडली. पारशीवाडी चाळ क्रमांक १ पाडून म्हाडाने तिथे सात मजली इमारत बांधली आहे. लालबागमध्ये बोहरी बदामी चाळीत ९९ खोल्यांची एक मजली इमारत होती. तिथे म्हाडाने २१ मजली इमारत नव्याने बांधली आहे. ३५० चौरस मीटरची सदनिका भाडेकरूंना मिळाली असल्याचे रहिवाशांनी सांगितले. याच धर्तीवर म्हाडाने क्‍लस्टर डेव्हलमेंट करावी, खासगी बिल्डरांकडून पुनर्विकासाला विरोध असल्याचे रहिवासी सांगत आहेत.  

हवे ३५० चौरस फुटांचे घर
भविष्यात रेल्वेच्या विकासाची योजना आहे. त्यामुळे चिंचपोकळी करी रोड या भागात रेल्वेसाठी पुनर्विकासात जागा सोडावी लागणार आहे. रेल्वेलगत साने गुरुजी मार्गावर उड्डाणपूल बांधण्याची योजना आहे. त्यामुळे क्‍लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून म्हाडाने विकास करावा, त्यासाठी नजीकच्या अब्दुल्ला गार्डनमध्ये संक्रमण शिबिराची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करावी, क्‍लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ३५० चौरस फुटाचे घर भाडेकरूंना मिळावे, आमचा खासगी विकसकावर विश्‍वास नाही, असे मत ऑर्थर रोड येथील शिंदे चाळ आणि पानसरे बंगली पुनर्बांधणी कमिटीचे अध्यक्ष गजाजन रेवडेकर यांनी व्यक्त केले.

लोकलच्या हादऱ्याने दुर्घटनेची भीती 
बैठ्या आणि तीन मजली असलेल्या ए, बी आणि सी अशा पाणसरे चाळी चिंचपोकळी भागात आहेत. पाणबाई निवास या इमारतीलाही शंभर वर्षे झाली आहेत. रेल्वेच्या लगत असलेल्या या चाळीची अवस्थाही जर्जर झाली आहे. रेल्वेमुळे या इमारती हादरत आहेत. भाडेकरूंना संक्रमण शिबिरे मिळत नसल्याचे येथे येणारे बिल्डर रहिवाशांना सांगत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com