"छात्र भारती'चे बुधवारी ऑनलाईन संमेलन 

"छात्र भारती'चे बुधवारी ऑनलाईन संमेलन 

मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरणानंतर दक्षता म्हणून "छात्र भारती' या विद्यार्थी संघटनेचा राष्ट्रीय छात्र कार्यक्रम पोलिसांनी उधळून लावला. यामुळे संतापलेल्या संघटनेने बुधवारी (ता. 10) ऑनलाईन संमेलन घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाद्वारे विद्यार्थी आपला संताप व्यक्त करणार आहेत. यात जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद आपले विचार मांडतील. 

पोलिसांच्या तावडीतून सुटल्यानंतर संतापलेल्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेत पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी देशभरातून उपस्थित विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधिनींनी देशपातळीवर सरकारविरोधात एकत्रित येण्याचे आवाहन केले. या पत्रकार परिषदेत शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी फडणवीस सरकारवर कडाडून टीका केली. विद्यार्थ्यांना घाबरणारे हे सरकार कसले, असा सवाल विचारत फडणवीस सरकारचा फेसिस्ट चेहरा समोर आल्याचा घणाघातही पाटील यांनी केला. राष्ट्रीय विद्यार्थी संमेलनाचे आयोजन शिक्षण पद्धतीतील विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी होते. या संमेलनाचा कोरेगाव भीमा प्रकरणाशी काडीमात्र संबंध नव्हता. बुधवारी रात्रीपर्यंत पोलिसांकडून संमेलनाच्या सुरक्षेबाबत आपण आढावा घेतला. त्या वेळी कोणताही आक्षेप नोंदवला गेला नाही. त्यामुळे फडणवीस सरकार खोटी माहिती देत आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली. 

विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी करणाऱ्या सरकारविरोधात शिक्षक, शेतकरी, कामगारांनी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन पाटील यांनी केले. याकरिता पुढील महिन्यात पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर येथे बैठका होणार आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली. गुरुवारी (ता. 4) सकाळी तब्बल 700 विद्यार्थ्यांना विविध पोलिस ठाण्यांत डांबले गेले. काही विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींचे मोबाईलही जप्त करण्यात आले, तर छात्र भारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे यांना पोलिसांकडून मारहाण केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. या प्रकरणानंतर विद्यार्थी संघटनांना अजून बळ मिळाले, विद्यार्थी संघटना आता सरकारविरोधात देशभरात लढणार, असे विद्यार्थी नेत्या रिचा सिंग आणि प्रदीप नरवाल यांनी सांगितले. 

हे सरकार विद्यार्थ्यांना घाबरले आहे. दिल्ली, हैदराबाद, अलाहाबाद येथील विद्यार्थी संघटनांचे बळ पाहून सरकारने भीतीपोटी संमेलन रोखले. विद्यार्थ्यांची गळचेपी करण्याऐवजी कोरेगाव भीमा प्रकरणातील दोषी मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पकडा. 
- कपिल पाटील, आमदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com