कर्करोगाच्या निदानासाठी डॉक्‍टरांचे ऑनलाईन ट्रेनिंग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

मुंबई - देशभरातील डॉक्‍टरांना कर्करोगाचे निदान करण्याचे प्रशिक्षण ऑनलाईन ट्युटोरिअलद्वारे देण्यात येणार आहे. कर्करोगाचे निदान वेळेत होऊन रुग्णाला त्याच्या गावात किंवा जवळच्या शहरात त्वरित उपचार मिळावेत, म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.  

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या दालनात शुक्रवारी (ता. १०) ऑनलाईन ट्युटोरिअरलचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी आरोग्यमंत्र्यांनी ट्युटोरिअलमुळे कर्करोगाचे निदान वेळेवर होण्यास मदत होईल, असा विश्‍वास व्यक्त केला.

ध्वनिचित्रफितींद्वारे डॉक्‍टरांना कर्करोग आणि त्यावरील उपचार याबाबत माहिती देण्यात येणार आहे. प्राथमिक अवस्थेत कर्करोगाचे निदान होऊन रुग्णांचा जीव वाचावा, हा या योजनेमागील उद्देश असल्याचे टाटा कर्करोग रुग्णालयाच्या डोके आणि मान विभागाचे प्रमुख डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले. वेळेवर उपचार मिळाल्याने उपचारांसाठी येणारा खर्च कमी होईल.

पहिल्या टप्प्यात तोंडाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. त्यात प्रथम डॉक्‍टरांना प्रशिक्षित करण्यात येईल. आरोग्य सेवक आणि आशा वर्कर यांच्या प्रशिक्षणासाठीही साध्या आणि सोप्या चित्रफिती बनवण्यात येणार आहेत, असेही डॉ. चतुर्वेदी म्हणाले. 

दंतरोग तज्ज्ञ, इंडियन मेडिकल असोसिएशनशी निगडीत डॉक्‍टर, स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील डॉक्‍टरांना कर्करोगाचे निदान करण्याचे प्रशिक्षण मिळेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जीवनशैलीशी निगडीत इतर आजारांबाबतच्या प्रशिक्षणासाठी ‘व्हिडीओ ट्युटोरिअल्स’ तयार करण्यात येणार आहेत. १४ नोव्हेंबरला मधुमेहाशी निगडीत व्हिडीओ ट्युटोरिअल्स प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती टाटा कर्करोग रुग्णालयाच्या शिक्षण विभागाचे प्रमुख डॉक्‍टर कैलाश शर्मा यांनी दिली. 

वेगवेगळे माॅड्युल
एमबीबीएस डॉक्‍टरांसाठी सध्याचे मॉड्युल व बीएएमएस डॉक्‍टरांसाठी वेगळे मॉड्युल बनवणार असल्याचे आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी सांगितले. 

डॉक्‍टरांचे मूल्यांकन  
डॉक्‍टरांना ऑनलाईन ट्युटोरिअलद्वारे कालबद्ध प्रशिक्षण दिल्यानंतर प्रत्येक डॉक्‍टरला मिळालेल्या माहितीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. डॉक्‍टरांना कर्करोगाबाबत किती माहिती मिळाली, याचा आढावा त्यातून घेतला जाईल. 

तोंडाचा कर्करोग पहिले का?
देशाची माहिती 
तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण भारतात 
तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये पुरुष सर्वाधिक
दर वर्षी १० लाख लोकांना कर्करोग 
देशात दर वर्षी पाच लाख रुग्णांचा मृत्यू

Web Title: mumbai news online training of doctors for diagnosis of cancer