सत्ताधाऱ्यांना घेरण्याची विरोधकांची रणनिती

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 31 जुलै 2017

मुंबई विद्यापीठ निकाल; मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणावर होणार आक्रमक

मुंबई विद्यापीठ निकाल; मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणावर होणार आक्रमक
मुंबई - पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांत पडलेल्या दुफळीने पहिल्या आठवड्याच्या कामकाजावर सत्ताधारी किंवा विरोधक या कोणाचीही छाप पडली नाही. पुरवणी मागण्या मांडणे आणि शेतकरी कर्जमाफीवर चर्चा यापलीकडे पहिला आठवडा गेला नाही. मात्र, उद्यापासून सुरू होणाऱ्या कामकाजाच्या दुसऱ्या आठवड्यात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची विरोधी पक्षांची रणनिती असल्याचे सांगितले जाते. मुंबई विद्यापीठाचा ढिसाळ कारभार, मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरण आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील भ्रष्टाचार या मुद्यांवर विरोधी पक्ष आक्रमक होणार आहेत.

मुंबई विद्यापीठाने 31 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तपासून पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले आहे. ते पूर्ण केले नाहीतर मंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्‍कभंग ठराव आणू, असे शिवसेनेचे अनिल परब यांनी म्हटले आहे; तर राज्यपालांना जबाबदार धरत कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याचे पडसाद या आठवड्यात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत पडण्याची शक्‍यता आहे. याबरोबरच मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी विरोधक मागणी करणार आहेत. या निमित्ताने कारागृहांच्या कारभाराबाबत विरोधक सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढण्याची शक्‍यता आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील भ्रष्टाचाराचा मुद्दाही चर्चेला येईल. या प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांचा राजीनामा मागितला आहे. ही मागणी अधिक जोर धरणार आहे.

Web Title: mumbai news Opponent's strategy to surround the powers