एक पाऊल हवे...  जगवण्यासाठी!

एक पाऊल हवे...  जगवण्यासाठी!

भारतीय संस्कृतीमध्ये दानाच्या महात्म्याचे अनेक ठिकाणी वर्णन केलेले आहे. पुराणकथांमध्येही गोदान, भूदान, वस्त्रदान आदी दानांचे वर्णन आहे. आपणही रोजच्या जीवनात मंदिरापासून रस्त्यावरील भिकाऱ्याला दान करतो. दान केल्याने दात्याला समाधान मिळते; तसेच गरजवंताचीही गरज पूर्ण होते. पर्यायाने दोन्ही जीव समाधानी होतात. दानाने पुण्य लागते, असेही समजले जाते. असे असले तरी मृत्यूनंतर आपल्या अवयवांचे दान करण्याबाबत आजही समाजात उदासीनता दिसते. अवयवदान केल्यास एखाद्या व्यक्तीस गरजू रुग्णास नवे जीवन लाभू शकते. त्यामुळेही पुण्य मिळू शकते; पण अवयवदानाबाबत समाजात असलेले गैरसमज, धार्मिक पगडा आदी बाबींचा अडसर असल्याने अनेक जण त्यासाठी पुढाकार घेत नाहीत. हे गैरसमज दूर होऊन अवयवदानाबाबत समाजात जागृती व्हावी, यासाठी सरकार, तसेच सेवाभावी व्यक्ती संस्थांनी केलेले प्रयत्न तोकडे पडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर समाजात याबाबत डोळसपणा यावा, या उद्देशाने सकाळ माध्यम समूहाने केलेला हा प्रयत्न...

केईएममध्ये भारतातील पहिला प्रयोग
भारतामध्ये १९५० ला मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालयात डॉ. पी. के. सेन यांच्या मार्गदर्शनाखाली कुत्र्यांवर मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाचे प्रयोग सुरू झाले. १९६५ मध्ये डॉ. सेन यांच्या चमूने मृत व्यक्तीचे मूत्रपिंड वापरून पहिली शस्त्रक्रिया केली. दुसरी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया १९६६ मध्ये करण्यात आली. पहिली शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचा शस्त्रक्रियेनंतर अकरा दिवसांनी मृत्यू झाला. दुसऱ्या रुग्णाचा शस्त्रक्रियेनंतर तिसऱ्या दिवशीच मृत्यू झाला. १९७१ मध्ये वेल्लूर येथील सीएमएस रुग्णालयातील डॉक्‍टरांनी जिवंत माणसाच्या शरीरातील मूत्रपिंड रुग्णाला बसविली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

अवयवदान म्हणजे काय?
जिवंतपणी किंवा मृत झाल्यानंतर आपले अवयव दुसऱ्या व्यक्तीला देणे म्हणजे अवयवदान! अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. जिवंत वा मृत व्यक्तीचा अवयव किंवा मानवी अवयवाचा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे अलग करून तो गरजवंत रुग्णाच्या शरीरात बसवणे, या प्रक्रियेस अवयव प्रत्यारोपण असे म्हणतात. ज्यांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झाले आहेत, अशा रुग्णांसाठी अवयवदान हाच एक आशेचा किरण असतो.  

गरज व्यापक जनजागृतीची 
अवयवदानाबाबत सरकार तसेच व्यक्ती- विविध संस्थांकडून अवयवदानाबाबत जनजागृजी होत असली, तरी देशात नेत्रदान व देहदान या पलीकडे त्याविषयी जागरुकता झालेली नाही. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे, हृदय, किडनी, यकृत यासह सर्व प्रकारची हाडे दान करता येतात. त्याचा वापर असे अवयव निकामी झालेल्या रुग्णांना होतो, याबाबत अनेक जण अनभिज्ञ आहेत. त्यामुळे अववदानाबाबत व्यापक जनजागृतीची गरज आहे. अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेतील धोका कमी होऊन सुरक्षित प्रत्यारोपण होण्यासाठी व अवयवांची व्यावसायिक आणि अवैध विक्री थांबावी म्हणून केंद्र सरकारने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा-१९९४ लागू केला. सध्या देशभरात सुमारे पाच लाख मूत्रपिंड, ५० हजार यकृत व २००० हून अधिक हृदयविकारांनी ग्रस्त रुग्ण असून ते अवयव दात्यांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात रोजच्या रोज वाढच होत आहे.

या अवयवांचे करता येते दान
  मेंदू मृत घोषित झालेली व्यक्ती - हृदय क्रिया सुरू असलेल्या पण डॉक्‍टरांनी मेंदू मृत घोषित केलेल्या व्यक्तीच्या मूत्रपिंड, फुप्फुस, यकृत, स्वादुपिंड, हृदय, आतडी, डोळे, त्वचा, हृदयाची झडप आदी अवयवांचे दान करता येते.

  नैसर्गिक मृत्यू - नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तीचे देहदान किंवा डोळे व त्वचा, हाडे या अवयवांचे दान करता येते.

  जिवंतपणी - जिवंतपणी केवळ आजी, आजोबा, नातू, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ, बहीण, पती किंवा पत्नी अशा जवळच्या नातेवाईकांसाठी अवयनदान करता येते. त्याव्यतिरिक्त अन्य कोणासाठी अवयवदान करायचे असल्यास सरकारी परवानगी गरजेची असते. त्यात आर्थिक देवाणघेवाण नसल्याची पडताळणी झाल्यावर अशा अवयवदानास परवानगी मिळते. जिवंतपणी मूत्रपिंड किंवा यकृताचा काही भाग आदी अवयवांचे दान करता येते. 

मृत्यूपश्‍चात अवयव प्रत्यारोपण  किती तासांत शक्‍य?  
 नेत्रदान -  चार ते सहा तासांच्या आत
 त्वचादान - चार ते सहा तासांच्या आत
 हाडे - सहा तासांच्या आत 
 फुफ्फुस  :  सहा तासांच्या आत
 मूत्रपिंड - ४८ तासांच्या आत

या परिस्थितीत अवयवदान नाकारले जाऊ शकते
 आत्महत्या, अपघाती, जळाल्याने किंवा पाण्यात बुडून मृत्यू
 काही कर्करोग, एड्‌सची लागण असल्यास
 विहित नमुन्यात मृत्यूचे प्रमाणपत्र नसल्यास

अवयवदान करायचेय?हे जाणून घ्या...
 संबंधित दात्याने जिवंतपणी किंवा त्याच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारसदाराने लेखी स्वरूपात तसे नमूद केलेले असावे, असा भारतीय कायद्याचा दंडक आहे. 
 अवयवदानासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असते. दात्याला विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा लागतो. 
 हा अर्ज कोणत्याही सरकारी रुग्णालयात किंवा मोठ्या खासगी रुग्णालयात उपलब्ध असतो.
 केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या www.notto.nic.in या संकेतस्थळावरूनही हा अर्ज डाऊनलोड करून घेता येऊ शकतो.
 दात्याच्या संमतीपत्रावर एखाद्या जवळच्या सज्ञान नातेवाईकांना सही गरजेचे असते. अर्ज भरल्यावर त्या व्यक्तीस डोनर कार्ड दिले जाते. 
 दात्याची डोनर कार्डवर सही असली तरी मृत्यूनंतर त्याच्या जवळच्या नातेवाईकांच्या संमतीशिवाय अवयवदान होऊ शकत नाही. म्हणून दात्याच्या इच्छेविषयी नातेवाईकांना माहिती असणे गरजेचे असते.

 अवयवदात्याचे निधन झाले असल्यास त्याच्या मृतदेहाची कायद्याने ताबेदार असलेल्या व्यक्तीच्या विहित लेखी मान्यतापत्राद्वारेही अवयवदान करता येऊ शकते.....

सरकारी रुग्णालयांत अवयवदान करता येते तसेच अवयव प्रत्यारोपण होते, हे फारच कमी लोकांना माहीत आहे. अवयव प्रत्यारोपण मोहिमेला गती यावी, यासाठी सरकारी रुग्णालयांत अवयव प्रत्यारोपण होते याबाबत जागरूकता होण्याची गरज आहे. सरकारी रुग्णालयांत कमी खर्चात तीही यशस्वी अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होते, याची माहिती मिळाल्यास नागरिक या रुग्णालयांकडे वळतील. त्यामुळे या शस्त्रक्रियांसाठी खासगी रुग्णालयांकडून होणारी लूट रोखण्यास मदत होईल.
- डॉ. अजित सावंत, युरोलॉजिस्ट, लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव

अवयवदानाबाबत झालेल्या जनजागृतीचा फायदा नेत्रदानासाठी नक्कीच झाला आहे. काही वर्षांच्या तुलनेत यंदा एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत झालेल्या नेत्रदानापैकी ४२ टक्के नेत्रपटले वापरली गेली आहेत. नेत्रदानासाठी आवश्‍यक काळजी घेतली गेल्याने तसेच योग्य पद्धतीने नेत्रदान झाल्याने बुब्बुळ प्रत्यारोपणाला फायदा झाला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या प्रशिक्षणाचाही फायदा झाला आहे. 
- डॉ. अरुण विर्धे, सहायक संचालक, आरोग्य विभाग

एखाद्या व्यक्तीचा मेंदू मृत असल्याचे समजल्यावर तिच्या नातेवाइकांचे अवयवदानासाठी समुपदेशन करण्यात येते. कमी शिकलेल्या नातेवाइकांकडून लगेचच सकारात्मक-नकारात्मक प्रतिसाद येतो. सुशिक्षित व्यक्ती इंटरनेटवर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करून नंतर प्रतिसाद देतात. तसेच अधिकाधिक प्रश्‍न विचारतात. त्यात कालापव्यय होतो. अनेकदा अवयवदानासाठी लागणारा वेळ निघून गेलेला असतो. 
- अवयवदान जागृतीसाठी काम करणारा समुपदेशक (नाव सांगण्यास नकार) 

भारतात अवयवदानाबाबत चांगली जनजागृती झाली आहे; मात्र लहान मुलांच्या हृदय प्रत्यारोपणासाठी आजही वाट पाहावी लागते.  
- डॉ. स्वाती गरेकर, हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ, फोर्टीस रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com