गरज प्रत्येकाने पुढे येण्याची!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

‘सकाळ’च्या साथीने अवयवदानाच्या चळवळीला बळ देण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. समाजाची मानसिकता बदलण्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे, अशी अपेक्षा विविध मान्यवरांनी व्यक्त केली...

‘सकाळ’ राबवत असलेली अवयवदानाची चळवळ अत्यंत गरजेची आहे; यात दुमत असण्याचे कारण नाही. आज मृत्यूनंतर अंत्यसंस्कार हे जितके नैसर्गिक आहे, तेवढेच अवयवदानही महत्त्वाचे वाटले पाहिजे. तशी मानसिकता व्हायला हवी. भावनेपेक्षा विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. अवयवदानाची माझीही इच्छा आहे. ‘सकाळ’च्या मोहिमेला माझा पाठिंबा.
- रत्नाकर मतकरी  (ज्येष्ठ साहित्यिक)

अवयवदानाबाबत जागरूकता आणण्यासाठी ‘सकाळ’ने सुरू केलेला प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. अवयवदानामुळे एका व्यक्तीला नवजीवन मिळते. अवयवदानासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी पुढे आले पाहिजे. रक्तदानाप्रमाणे अवयवदानासाठीही होणे गरजेचे आहे. आपल्या कामकाजात अवयवदान जागृतीचा समावेश केल्यास नागरिकांना फायदा होऊन त्यांचे प्राण वाचतील.
- संजीव जयस्वाल  (आयुक्त, ठाणे महापालिका)

समाजात नेत्रदान व रक्तदान सोडले तर अवयवदानाबद्दल फारशी माहिती नाही. माहितीअभावी अवयवदानाचे महत्त्व अद्याप नागरिकांना कळलेले नाही. त्यासाठी जनजागृती गरजेची आहे. ‘ब्रेन डेड’ वा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झालेल्या रुग्णाचे इतर अवयव कामास येऊ शकतात, हे सांगण्याची गरज आहे. भविष्यात आमची महापालिकाही जनजागृती करताना दिसेल. 
- डॉ. एन. रामास्वामी  (आयुक्त, नवी मुंबई महापालिका)

जगात सर्वात श्रेष्ठदान म्हणजे अवयवदान. अवयवदानावर सर्वांनी भर द्यायला हवा. मृत्यूनंतर शरीरावर अग्निसंस्कार करणे वा त्याचे दफन करून मौल्यवान अवयव मातीमोल करण्यापेक्षा त्यातून अनेक जीव जगवू शकतो, हे सूत्र समाजातील सर्व स्तरांमधील घटकांना पटवून दिले पाहिजे. तेव्हाच अवयवदानाचे महत्त्व नागरिकांना समजेल. मग आपोआपच अवयवदानाच्या चळवळीला बळ मिळेल. 
- डॉ. सुधाकर शिंदे  (आयुक्त, पनवेल महापालिका)

आज आधुनिक युगातही अंधश्रद्धेच्या भीतीपोटी नागरिक अवयवदान करण्यास पुढाकार घेत नाहीत. राज्य सरकारबरोबरच पालिकेच्या माध्यमातूनही अवयवदानाबाबत शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, सामाजिक संस्थांच्या मदतीने अवयवदानाबाबतचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्याची गरज आहे. ठाणे पालिकेची रुग्णालये, आरोग्य केंद्रे व नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेणार आहे.
- मीनाक्षी शिंदे (महापौर, ठाणे)

आपल्या देशापेक्षा आकाराने खूपच लहान असलेल्या श्रीलंकेमध्ये अवयवदानाचे प्रमाण जास्त आहे. तिथे बौद्धधर्मीय जास्त असल्याने देहदानाचा प्रचार जास्त आहे. याउलट आपल्याकडे संभ्रम कायम आहे. अंधश्रद्धेमुळे भारतात अवयवदानाला अद्याप प्रतिसाद मिळत नाही. त्यासाठी जनजागृतीची आवश्‍यकता आहे. ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे सुरू झालेली जनजागृती उल्लेखनीय आहे. 
- नितीनकुमार राऊत  (राज्य सरचिटणीस, अंनिस) 

‘सकाळ माध्यम समूह’ नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक मोहिमा हाती घेते. आजही समाजात अवयवदानाबद्दल उदासीनता दिसते. आम्ही समाजातल्या अनेक प्रश्‍नांवर चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकत असतो. अवयवदानाचे महत्त्व या विषयावर आधारित एक चित्रपट दाखविण्याचा मानस आहे. ‘सकाळ’ने अवयवदानविषयी जनजागृती करण्यासाठी एक पाऊल पुढे उचलले, त्याबद्दल आभार. 
- संतोष डावखर  (निर्माता, मराठी लघुपट)

Web Title: mumbai news organ donation sakal positive