ओशो आश्रम ट्रस्ट गैरव्यवहार; ईओडब्ल्यूकडे तपास द्यावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

मुंबई - आचार्य रजनीश यांच्या पुण्यातील "ओशो आश्रम ट्रस्ट'मधील कथित गैरव्यवहाराचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करता येईल का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिस आयुक्तांकडे आज केली.

मुंबई - आचार्य रजनीश यांच्या पुण्यातील "ओशो आश्रम ट्रस्ट'मधील कथित गैरव्यवहाराचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करता येईल का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिस आयुक्तांकडे आज केली.

रजनीश यांच्या इच्छापत्रावर बनावट स्वाक्षरी करण्यात आल्याचा आरोप करणारी याचिका ओशो यांचे कार्यकर्ते योगेश ठक्कर यांनी न्यायालयात केली आहे. या याचिकेवर आज न्या. भूषण गवई यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. पुण्यात ओशो यांचा आंतरराष्ट्रीय न्यास आहे. त्याचा कारभार पाहणाऱ्यांनी रजनीश यांची बनावट सही इच्छापत्रावर केल्याचा आरोप याचिकेत आहे. ओशो न्यासाचा बहुतांश निधी काही विश्‍वस्तांनी व्यक्तिगत व्यवहारांमध्ये गुंतविला आहे, असा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.

ठक्कर यांनी पाच वर्षांपूर्वी याबाबत पुणे पोलिसांकडे फिर्याद नोंदविली आहे; मात्र त्याबाबत विशेष तपास झालेला नाही, असे याचिकादाराच्या वतीने सांगण्यात आले. पुणे पोलिसांचा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग (ईओडब्ल्यू) आहे का, जर तसे असेल तर या प्रकरणाचा तपास विशेष पद्धतीने होऊ शकेल, ईओडब्ल्यूकडे तपास वर्ग का करत नाही, असा प्रश्‍न खंडपीठाने उपस्थित केला. पुणे पोलिस आयुक्तांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे.

Web Title: mumbai news osho ashram scam inquiry to eow