पंढरपूर देवस्थानावर वारकऱ्यांच्या समितीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

मुंबई - पंढरपूरला आषाढी-कार्तिकीप्रमाणेच इतर दिवशीही भक्तांची मोठी गर्दी असते. वारकऱ्यांच्या प्रथा-परंपरांचा विचार वारकऱ्यांना प्रकर्षाने कळू शकतो. त्यामुळे पंढरपूर देवस्थान समितीवर केलेली राजकीय नियुक्ती रद्द करून वारकऱ्यांची समिती स्थापन करावी, अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे; अन्यथा आझाद मैदानावर 10 ऑक्‍टोबर रोजी वारकरी आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी येतील, असा विश्वास संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मानकरी राजाभाऊ महाराज चोपदार यांनी व्यक्त केला. या आंदोलनाला वारकरी संप्रदायाबरोबरच इतर संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत राजाभाऊ महाराज चोपदार यांनी ही घोषणा केली.

पंढरपूरच्या देवस्थान समितीवर राज्य सरकारने भाजपचे नेते अतुल भोसले यांची नियुक्ती केली आहे. भोसले यांनी समितीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मी पहिल्यांदाच पंढरपूरला येत असल्याचे सांगितले होते. अशी व्यक्ती वारकऱ्यांचे प्रश्न कसे काय समजून घेऊ शकेल. वारीदरम्यान यासंदर्भात आंदोलनही केले गेले. या वेळी वारकऱ्यांच्या प्रतिनिधींना समितीत घेतले जाईल, असे आश्‍वासनही मिळाले; मात्र कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे 10 ऑक्‍टोबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर संतवीर बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली भजनी आंदोलन करण्यात येणार आहे.

Web Title: mumbai news pandharpur devasthan warkati committee demand