''आर.आर.पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रुप अनिल देशमुखांनी बदलले''

''आर.आर.पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रुप अनिल देशमुखांनी बदलले''

मुंबई: ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महिलांचे संसार तसेच तरुण पिढी वाचविण्यासाठी डान्स बारवर बंदी आणली त्याच पक्षाचे हे वेगळे रुप गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामार्फत दिसत आहे, असा टोला विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. 

मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनी खुद्द गृहमंत्र्यांवर लेटर बाँब टाकल्यावर आक्रमक झालेल्या भाजप तर्फे आज मुंबईत जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले. दादर रेल्वेस्थानकाबाहेर आज सकाळी झालेल्या आंदोलनात मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, मुंबई प्रभारी अतुल भातखळकर, अन्य आमदार, नगरसेवक सहभागी झाले होते. तर दरेकर यांनी पक्षकार्यालयासमोर आंदोलन केले. 

माजी पोलिस आयुक्तांचे आरोप ही अत्यंत शरमेची आणि भयावह बाब असून त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा तसेच गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मुळात अनिल देशमुख यांना ही खंडणी घेण्यास कोणी सांगितले होते, अजूनही देशमुख यांचा राजीनामा न घेतल्याने देशमुखांना खंडणी घ्यायला लावणारेच देशमुखांना वाचवत आहेत का, देशमुखांच्या गॉडफादरचाही या प्रकरणाशी संबंध आहे का, असेही प्रश्न यावेळी भातखळकर यांनी उपस्थित केले. 

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने थेट राज्याच्या गृहमंत्र्याविषयी असे आरोप केले आहेत. इतकेच नव्हे तर अनिल देशमुखांच्या अशा कारभाराची माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह, शरद पवार, अजित पवार यांना सुद्धा दिली होती, असे सुद्धा परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ अनिल देशमुख यांच्यापर्यंतच मर्यादित नसून, यात आणखी मोठे भ्रष्ट नेते असण्याची शक्यता असल्याचे सुद्धा भातखळकर म्हणाले.

रक्षक भक्षक बनत आहेत - दरेकर

परमबीर सिंह यांच्या आरोपांमुळे महाराष्ट्र सरकारची अब्रू वेशीला टांगली आहे. अनिल देशमुख यांनी वाझेंना वसुलीच काम दिले होते का ? हे महाविकास आघाडीने स्पष्ट करावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली आज पक्ष कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात गृहमंत्र्यांच्या पुतळ्याला चपलेचा मार देण्यात आला. 

हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला, परंपरेला काळीमा फासणारी गोष्ट झाली आहे. रक्षक भक्षक बनत असेल, कुंपणच जर शेत खात असेल तर राज्यातील जनता कोणावर विश्वास ठेवणार असा प्रश्न जनतेसमोर आहे. ज्यावेळी विधिमंडळात आम्ही हा विषय मांडत होतो, त्यावेळी वाझेंची पाठराखण कोण करत होतं? असा प्रश्न उपस्थित करून दरेकर म्हणाले की, अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र पोलिसांची इभ्रत धुळीला मिळवली आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा न दिल्यास मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा.  

हेही वाचा- 'त्या' बुकीनं दिलेल्या 5 सिमकार्डचं सचिन वाझेंनी काय केलं? होणार मोठा खुलासा

सरकारची भूमिका चुकीच्या गोष्टींना आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्याची आहे. हे सरकार प्रत्येक प्रकरणात उशिरा चौकशी करते, त्यामुळे गुन्हेगारांना पुरावे नष्ट करायला सरकार संधी तर देत नाही ना, असा संशय जनतेच्या मनात येत आहे, असेही दरेकर म्हणाले.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai news Parambir singh letter BJP protest pravin darekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com