एल्फिन्स्टन पुलाच्या कामाची रेल्वेमंत्र्यांकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017

मुंबई - रेल्वेच्या देशभरातील गर्दीच्या स्थानकांमध्ये पादचारी पुलाला जोडणारे तीन हजार सरकते जिने आणि मुंबईतील रेल्वे स्थानकांवर 372 सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्हीचे जाळे तयार करण्यात येणार आहे. स्टेशन मास्तर, रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल, स्थानिक पोलिस यांची नजर त्यातील फुटेजवर असेल, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी दिली.

एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर एल्फिन्स्टन रोड, आंबिवली आणि करी रोड या तीन स्थानकांतील पूल बांधण्याचे काम लष्करावर सोपवण्यात आले. त्यापैकी आंबिवली आणि एल्फिन्स्टन पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. एल्फिन्स्टन आणि करी रोड पुलाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर रेल्वेमंत्री बोलत होते. 31 ऑक्‍टोबरला मुंबई भेटीदरम्यान ज्या घोषणा केल्या होत्या, त्या पूर्ण होत आहेत. संबंधित विभागाला देण्यात आलेल्या जबाबदाऱ्याही वेळेत पार पडल्या आहेत. सर्व विभागांनी तातडीने कामे हाती घेतली आहेत; तसेच तिन्ही पुलांचे बांधकाम वेळेच्या आधी पूर्ण होईल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.

मंत्र्यांचा लोकल प्रवास
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी पुलाच्या कामाची पाहणी केल्यावर करी रोड ते सीएसटी प्रवास लोकलने केला. त्यांनी लोकलमधील प्रवाशांशीही संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी माटुंगा ते सीएसटीदरम्यान प्रवास करणाऱ्या गिरीश दवे या ज्येष्ठ नागरिकाने रेल्वे प्रशासन करीत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news piyush goyal watching to elphinstone bridge work