प्लॅस्टिक पिशवी वापरावर 500 ते 25 हजारांचा दंड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

मुंबई - प्लॅस्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना 500 ते 25 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. सामान्य नागरिकांच्या हातात बंदी असलेल्या प्लॅस्टिक अथवा थर्माकोलच्या वस्तू आढळल्यास किमान 500 रुपयांचा दंड होऊ शकतो. बंदी जाहीर झाल्यानंतर नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने घेतला आहे.

गुढीपाडव्याला प्लॅस्टिक बंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी राज्य सरकारने अधिसूचना जारी केली. त्यानंतर राज्यात प्लॅस्टिक व थर्माकोल वस्तूंच्या वापरावर बंदी आली; मात्र याबाबत सामान्य नागरिकांपर्यंत योग्य ती माहिती न पोचल्यामुळे आजही सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर सुरू आहे. त्यामुळे आता प्लॅस्टिकबंदीचा संदेश जाहिराती, तसेच विविध प्रसारमाध्यमांद्वारे जनसामान्यांपर्यंत कसा पोचवता येईल, याबाबतचा आराखडा बनवण्यात सोमवारी पर्यावरण विभागाचे अधिकारी गुंतले होते.

स्थानिक प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच पोलिसांना या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या कारवाईची माहिती ठराविक मुदतीत राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाला मिळण्यासाठी स्वतंत्र पोर्टल विचाराधीन आहे. साप्ताहिक अथवा मासिक आढाव्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असेही पर्यावरण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: mumbai news plastic bag use fine