'उकीरड्या'तील हुंदका सारस्वतांच्या कानी!

अनिश पाटील
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

मुंबई - कवी नामदेव ढसाळ यांच्या "गोलपिठा'ने जगातील साहित्य विश्‍व ढवळून काढले. तो गोलपिठा आजही तसाच आहे. महानगरी बदलत असली, तरी बदलत्या गावकुसाबाहेरचा हा "उकीरडा' बदलण्यासाठी कुणीच पुढे येताना दिसत नाही. उलट इथले शोषण, जीवघेण्या दुःखाचे पापुद्रे, वेदना, दारिद्य्र संपता संपत नाही. खाकी वर्दीतील एक संवेदनशील मनाचा कवी पोलिस हवालदार नंदकुमार सावंत यांनी या उकीरड्यातील स्त्रियांच्या भावना आणि त्याचे जगणे शब्दबद्ध केले आहे. त्यांच्या कवितेद्वारे निघालेल्या उकीरड्यातील हुंदक्‍याची दखल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने घेत सावंत यांचा सन्मान केला आहे.

सावंत यांच्या "गावकुसाबाहेरचा उकीरडा' या कवितेची निवड बडोद्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी झाली आहे. संमेलनात कविता सादर करणारे सावंत हे मुंबई पोलिस दलातील पहिले कर्मचारी ठरणार आहेत. याबद्दल मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सावंत यांचा सत्कार केला. नागपाडा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत बेहराम नाका चौकी ही कामाठीपुऱ्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. तेथे कार्यरत असताना त्यांनी कामाठीपुऱ्यातील "जीवन' पाहिले. तेथील व्यथा समजून घेतल्या आणि त्या शब्दबद्ध केल्या.

गावकुसाबाहेरचे जीवघेणे वास्तव त्यांनी ताकदीने मांडल्यामुळेच त्यांची दखल साहित्य संमेलनाने घेतली आहे. सावंत सध्या पोलिस उपायुक्त (बंदरे) यांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. नाटक आणि मालिकांमध्येही सावंत यांनी अभिनय केला आहे. नाट्य संमेलनातही त्यांच्या नाटकांना पारितोषिके मिळाली आहेत. महाविद्यालयात असल्यापासून त्यांना कवितेची आवड आहे. फेसबुकमुळे सावंत यांच्या कविता अनेकांपर्यंत पोहोचल्या आणि त्यांनी "सहजच' या फेसबुक पेजमध्ये कविता लिहिण्यास सुरवात केली.

नंदकुमार सावंत यांची कविता
कळकटलेल्या भिंतींना
हे काही नवीन नाही
करकरणारी खाट ही विटाळलेलीच
ती काही शालीन नाही...
मिणमिणणारे दिवे ही जेव्हा
शरमेने मान खाली घालतात
तेव्हा त्या काळोख्या खोलीचे
मनही गुदमरून जाते...
अशी कैक विस्कटलेली मने
म्हणजे जळणाऱ्या वाती
गावकुसाबाहेरचा हा "उकीरडा'
जागवत असतो कैक राती...
भेदरलेले नवे कोकरू जेव्हा
काळोख्या खोलीत जमा होते
तेव्हा बहर ओसरलेले फूल
स्मृतितून विस्मरून जाते...

Web Title: mumbai news poem nandkumar sawant