पोलिसांचा चोख बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

मुंबई - नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोणतीही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतली होती. साध्या वेशातील पोलिसही जागोजागी तैनात होते. खुद्द मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर गेट वे ऑफ इंडिया परिसरात गस्त घालत होते. पहाटे सहा वाजेपर्यंत वरिष्ठ अधिकारी रस्त्यांवर फिरत होते. 

मुंबई - नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोणतीही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतली होती. साध्या वेशातील पोलिसही जागोजागी तैनात होते. खुद्द मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर गेट वे ऑफ इंडिया परिसरात गस्त घालत होते. पहाटे सहा वाजेपर्यंत वरिष्ठ अधिकारी रस्त्यांवर फिरत होते. 

सुमारे ३० हजार पोलिस रस्त्यांवर तैनात होते. तरुणींच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्याकरता प्रत्येक पोलिस ठाण्यात खास पथक तयार करण्यात आले होते. सायंकाळपासून गेट वे, मरिन ड्राईव्ह, जुहू, मढ-मार्वे-गोराई आदी परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. बंदोबस्तामुळे दोन दिवसांपासून पोलिस अधिकारी घरीच गेले नव्हते. रात्री १२ नंतर जुहू चौपाटीवर गर्दी वाढली. त्यामुळे काही वेळ चौपाटी परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. मढ-मार्वे परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. गल्लीबोळांतही पोलिसांची गस्तीची वाहने फिरत होती. मरिन ड्राईव्ह परिसरात पहाटेपर्यंत जल्लोष सुरू होता. ग्रुप सेल्फी काढण्यात सारे मग्न होते. मरिन ड्राईव्ह परिसरात शीघ्र कृती दलाचे शस्त्रधारी जवान नेमण्यात आले होते. रात्री किरकोळ वादातून ॲण्टॉप हिल परिसरात हाणामाऱ्या झाल्या. दारूच्या बाटल्या एकमेकांवर फेकून मारल्याने चार जण जखमी झाले. त्यांना शीव टिळक रुग्णालयात नेण्यात आले. दारू जास्त प्यायलेल्यांना, किरकोळ जखमींना कूपर, शताब्दी, केईएम व नायर रुग्णालयात नेण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हाणामारीचे प्रकार यंदा कमी झाले.

चर्नी रोड स्थानकात हुल्लडबाजी 
गेट वे आणि मरिन ड्राईव्हला जल्लोष केल्यानंतर पहाटे ४.२० ची विरार लोकल पकडण्याकरता तरुणांनी चर्नी रोड स्थानकात गर्दी केली होती. लोकलची वाट पाहत अनेक जण पुलाच्या पायऱ्यांवर बसले होते. लोकल येताच आरडाओरड करत ते आत शिरले. काही जण दारातलोंबकळत होते. त्यांनी प्रवाशांना आत येऊ दिले नाही.

Web Title: mumbai news police bandobast for new year