नवी मुंबईतील 44 टक्के वाहतूक पोलिसांना रक्तदाब 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

नवी मुंबई - शहरातील वाहतूक विभागात कार्यरत सुमारे 44 टक्के पोलिसांना रक्तदाबाचा त्रास होत आहे, तर सुमारे 22 टक्के वाहतूक पोलिस फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त आहेत. रक्तदाब व फुफ्फुसाचा त्रास होत असतानाच पोलिस दलातील 60 टक्के कर्मचाऱ्यांना दृष्टीविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

वाहतूक पोलिस उपायुक्त नितीन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेच्या प्रत्येक युनिट कार्यालयात तीन महिन्यांपासून रोटरी क्‍लब खारघरच्या वतीने वाहतूक शाखेच्या 16 युनिटमध्ये कार्यरत 445 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यात हा धक्कादायक निष्कर्ष उघड झाला. सर्वाधिक पोलिस कर्मचारी दृष्टिदोषाने आजारी आहेत. पोलिस आयुक्त हेमंत नगराळे व उपायुक्त नितीन पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मोफत चष्मेवाटप करण्यात आले. 

वाहतूक पोलिसांना वाहतूक नियोजन व बंदोबस्तासाठी अधिक काळ बाहेर राहून काम करावे लागते. रस्त्यावर रहदारीच्या वेळी त्यांचा धूळ व प्रदूषणाशी सर्वाधिक संपर्क येतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. गाड्यांच्या प्रदूषणामुळे अनेक पोलिसांना कोणतेही व्यसन नसतानाही फुफ्फुसाच्या आजारांना सामोरे जावे लागते. वायू प्रदूषणामुळे वाहतूक पोलिसांना होणारे श्‍वसनाचे आजार वाढले आहेत, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वायू प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी पोलिसांकडे मास्क नाहीत. त्याचाही फटका पोलिसांना बसत आहे.

Web Title: mumbai news police Blood pressure