मुंबईतील शाळांभोवती पोलिस घालणार गस्त

मंगेश सौंदाळकर
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

मुंबई - पोलिसांचे मुंबईतील शाळांकरिता मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शाळा भरताना आणि सुटताना पोलिस तिथे गस्त घालणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम काही शाळांत सुरू केला जाणार आहे. लवकरच मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर पालक व शिक्षक संघटनांची बैठक घेणार आहेत.

मुंबईत सरकारी आणि खासगी जवळपास चार हजार शाळा आहेत. काही शाळा झोपडपट्ट्यांजवळ आहेत. कधी शिक्षकेतर, तर कधी शाळेच्या बसमधील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याची गंभीर दखल मुंबई पोलिसांनी घेतली आहे. पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी शाळांत "स्कूलदीदी' हा उपक्रम सुरू केला आहे. पोलिस अधिकारी महिला शाळांत जाऊन विद्यार्थ्यांना चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखावा, हे सांगत आहेत.

शाळेच्या सुरक्षेकरिता मार्गदर्शक सूचना तयार केल्या जात आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणीही केली जाणार आहे. शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. शाळा प्रशासनाच्या नेमक्‍या अडचणीही जाणून घेतल्या जातील. अडचणींचा अभ्यास करून, त्या सोडवल्या जातील. यापुढे शाळांजवळ कुणी संशयास्पद स्थितीत फिरताना दिसल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शाळा भरताना आणि सुटताना पोलिस गस्त घालणार आहेत.

Web Title: mumbai news Police will lay around the schools in Mumbai