व्यावसायिक झोपड्यांना मालमत्ता कराची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

महापालिका शिवसेनेच्या प्रस्तावाच्या प्रतीक्षेत

महापालिका शिवसेनेच्या प्रस्तावाच्या प्रतीक्षेत
मुंबई - शिवसेनेने 500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्‍वासन दिले असल्याने महापालिकेचा झोपड्यांना मालमत्ता कर लावण्याचा प्रस्ताव रखडला आहे. शिवसेनेने मालमत्ता माफीची मागणी केल्यास त्या बदल्यात प्रशासनाकडून व्यावसायिक झोपड्यांना मालमत्ता कर लागू करण्याचा प्रस्ताव पुढे केला जाण्याची शक्‍यता आहे.

झोपड्यांना मालमत्ता कर लागू करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विधी समितीने निवडणुकीपूर्वी फेटाळला होता; पण प्रशासनाला कोणत्याही परिस्थितीत हा मालमत्ता कर लागू करायचा आहे. मालमत्ता कर माफ करण्यासाठी शिवसेना ठरावाची सूचना मांडणार आहे. त्यातूनच कराबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट होईल. त्यानंतर झोपड्यांना मालमत्ता कर लागू करण्याचा सुधारित प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. शिवसेनेने निवासी मालमत्तांना करमाफीचे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे निवासी झोपड्यांना मालमत्ता कर लागू करता येणार नाही. व्यावसायिक झोपड्यांना मालमत्ता कर लागू करता येतो, असे या अधिकाऱ्याने सांगितले. शिवसेनेला 500 चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मालमत्तांना कर माफ करायचा असल्यास प्रशासनाकडून व्यावसायिक झोपड्यांना मालमत्ता कर लागू करण्याचा प्रस्ताव पुढे केला जाण्याची शक्‍यता आहे.

मुंबईत 15 लाख घरे 500 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाची आहेत. त्यापासून मिळणारे वार्षिक उत्पन्न 400 कोटींचे आहे.

व्यावसायिक झोपड्यांना प्रस्तावित वार्षिक कर
क्षेत्रफळ (चौरस फूट)- तळमजला- वरील मजल्यांसाठी

125 पर्यंत - 4800 - 3600
125 ते 250- 7200- 5400
250 ते 500 - 10,800 - 8100
500 ते 1000 - 14,400 - 10,800
1000 वरील - 18,000 - 13,500

Web Title: mumbai news The possibility of making property to commercial huts