पोस्टमन पत्र आणणार मोटारसायकलवरून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

मुंबई - मुंबईसारख्या शहरात एका पोस्टमनला दररोज 17 किलोमीटर इतके अंतर कापावे लागते. टॉवरच्या निमित्ताने मुंबईच्या उभ्या पद्धतीने झालेल्या विस्तारीकरणामुळे पोस्टमनचे कामही वाढवले आहे. पोस्टमनला मोटारसायकल देण्याचा प्रयोग मुंबईत पहिल्यांदा होणार आहे. पोस्टाच्या माध्यमातून सेवा पोहचवताना अंतर वेगाने कापण्यासाठी मुंबईतील दादर विभागात हा प्रयोग होऊ घातला आहे. देशातला हा पहिलाच प्रयोग असावा, अशी शक्‍यता मुंबई-पूर्व विभागाचे वरिष्ठ अधीक्षक ईश्‍वर पाटील यांनी वर्तवली.

ई-कॉमर्सचा व्यवसाय मुंबईत वाढल्यामुळेच पोस्टमनच्या कामाचा विस्तार पाहता मोटारसायकलचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार आहोत, अशी माहिती पाटील यांनी दिली. मुंबईच्या विस्तारासोबतच पोस्टमनचे दैनंदिन कामही वाढले आहे. ई-कॉमर्सच्या निमित्ताने पोस्टाने चारचाकी गाड्यांची खरेदी केली आहे; पण मुंबईतील वाहतुकीची मर्यादा पाहता मोटारसायकल आणखी वेगाने काम करण्यासाठी मदतीची ठरेल, असेही ते म्हणाले.

सायकलच ब्रॅंडिंग
पोस्टाच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसार व्हावा आणि पोस्टमनला मदत व्हावी, अशी सायकलही दादर विभागाने दोन महिन्यांपूर्वी विकसित केली आहे. या सायकलला दोन्ही बाजूंना बाइकची डिक्की; तर सायकलच्या समोरच्या बाजूला एक छोटा कॅरिअर स्टॅंडही बसवण्यात आलेला आहे. पोस्टाच्या विविध योजनांची जाहिरातही या स्टॅंडवर करण्यात आली आहे.

Web Title: mumbai news postman letter motorcycle

टॅग्स