महापालिकेचे पितळ उघडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

पावसाळ्याआधी संपूर्ण डांबरीकरण करणे शक्‍य नसते. त्यामुळे फक्त खड्डे पडलेल्या ठिकाणी डागडुजी केली जाते. त्याप्रमाणे डागडुजी केली होती. ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत ते बुजविण्यात येतील. पावसाळ्यानंतर संपूर्ण डांबरीकरण करण्यात येईल.
- अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त

बेलापूर - पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेने डागडुजी केलेल्या रस्त्यावर काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावरून वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. याकडे आता पालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पावसाळा वगळता नवी मुंबईतील रस्ते महावितरण, एमटीएनएल, महानगर गॅस यांसारख्या कंपन्या केबल आणि पाईप लाईन टाकण्यासाठी नेहमी खोदतात. पालिकेची परवानगी घेऊनच रस्त्यावर खोदकाम केले जाते. काम झाल्यावर या रस्त्याची डागदुजी करणे पालिकेचे काम असते. नेरूळ आणि सी-वूडस्‌मध्ये अनेक ठिकाणी महानगर गॅस कंपनीने रस्ते खोदले होते. पावसाळा सुरू होत असताना पालिकेने या रस्त्यांची डागडुजी केली होती; परंतु दोन-तीन दिवसांच्या पावसातच त्याची दुरवस्था झाल्याने रस्तेदुरुस्तीच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्‍न निर्माण झाला आहे. पालिकेने रस्त्याच्या केलेल्या डागडुजीच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. नेरूळ सेक्‍टर चार, आठ, १०, २० आणि सी-वूडस्‌ रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिमेला रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खाड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यात वाहने आदळतात. दुचाकींना अपघात होतात. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जात आहे.

पालिकेने दुरुस्त केलेल्या रस्त्यांवर त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत. पावसाळा सुरू होण्याआधी हे काम करायला हवे होते. या खड्ड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचून वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने वाहने आदळत आहेत. पालिकेने हे खड्डे पुन्हा भरावेत.

- नीलेश तुपे, नागरिक, नेरूळ  

Web Title: mumbai news Potholes road