नवा पर्याय देणार - आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

मुंबई - 'देशाच्या सर्वंकष विकासाचा आराखडा नसल्याने आणि विश्‍वासार्ह नेतृत्व नसल्यामुळे लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. अशा परिस्थितीत व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेऊन उभे राहण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीसाठी डाव्या आणि समविचारी घटकांना सोबत घेऊन नवा पर्याय दिला जाईल,'' अशी राजकीय रणनीती भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (ता. 19) येथे मांडली.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात आयोजित केलेल्या वार्तालापात ऍड. आंबेडकर बोलत होते. ऍड. आंबेडकर म्हणाले, की विश्‍वासार्ह राजकीय नेतृत्वातील शेवटचा दुवा अटलबिहारी वाजपयी होते. पक्षाच्या विरोधात मत मांडण्याची त्यांची ताकद होती. आजच्या राजकारणात तसे नेतृत्व दिसत नाही. जातिव्यवस्थेवर आधारित अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. या अर्थव्यवस्थेने अनेक मागास जातींचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. कर्नाटकमधील निवडणुकीनंतर देशात बदल घडेल, असे भाकीतही त्यांनी केले.

भीमा कोरेगाव दंगलीनंतर राज्यव्यापी बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. समविचारी पक्ष आणि संघटना एकत्र आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर येत्या 22 जानेवारीला दिल्ली येथे सर्वसमावेशक भूमिका एका पत्रकार परिषदेत जाहीर केली जाईल, अशी माहिती ऍड. आंबेडकर यांनी दिली.

Web Title: mumbai news prakash ambedkar talking