मंजुळा शेट्येंच्या मृत्यूनंतर कैदी महिलांची तोडफोड 

मंगेश सौंदाळकर
बुधवार, 28 जून 2017

मुंबई - भायखळा येथील महिला तुरुंगातील वॉर्डन मंजुळा शेट्ये यांच्या मृत्यूनंतर तेथील कैदी महिलांनी धुडगूस घातला. सीसी टीव्ही कॅमेरे तोडले. गैरवर्तनाची नोंदपुस्तिका जाळली. तिखटाचे पाणी अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकले. लहान मुलांचा ढालीसारखा वापर केला. अशा एकापेक्षा एक धुडगूसकथा उजेडात येत असल्याने हा हल्ला पूर्वनियोजित असावा, असा अंदाज विश्‍वसनीय सूत्रांनी व्यक्त केला आहे. 

मुंबई - भायखळा येथील महिला तुरुंगातील वॉर्डन मंजुळा शेट्ये यांच्या मृत्यूनंतर तेथील कैदी महिलांनी धुडगूस घातला. सीसी टीव्ही कॅमेरे तोडले. गैरवर्तनाची नोंदपुस्तिका जाळली. तिखटाचे पाणी अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकले. लहान मुलांचा ढालीसारखा वापर केला. अशा एकापेक्षा एक धुडगूसकथा उजेडात येत असल्याने हा हल्ला पूर्वनियोजित असावा, असा अंदाज विश्‍वसनीय सूत्रांनी व्यक्त केला आहे. 

जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना मंजुळा यांचा मृत्यू झाल्याची बातमी शनिवारी (ता.24) तुरुंगात धडकताच महिला कैद्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तुरुंगात तोडफोड केली. मालमत्तेचे नुकसान केले. या गदारोळाच्या मास्टरमाईंड चार कैदी आहेत. त्यांनीच अन्य कैद्यांना धुडगूस घालण्यास प्रवृत्त केल्याची माहिती उघडकीस आली आहे. 

मुलांची केली ढाल 
तुरुंगातल्या खरेदीगृहातून कैद्यांना चटणी-मसाल्याची विक्री करण्यात येते. त्याचा वापर कैद्यांनी केला. पाण्याच्या बाटल्यांमध्ये चटणी मसाला मिसळून ते पाणी अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकण्यात आले. ते डोळ्यात गेल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी केली आहे. मसाल्याचे पाणी संपल्यावर कैद्यांनी अधिकाऱ्यांवर पाण्याचा मारा केला. हे करताना तुरुंगातील 15 मुलांचा ढालीसारखा वापर करण्यात आला. मुलांना जमिनीवर आपटण्याच्या धमक्‍याही या कैदी अधिकाऱ्यांना देत होत्या, अशी माहिती आता बाहेर येत आहे. कैद्यांच्या गैरवर्तनाच्या नोंदवह्याही कैद्यांनी जाळल्या. त्या नष्ट झाल्याने तुरुंग प्रशासनाला डोकेदुखी होणार आहे. 

सीसी टीव्हीची तोडफोड 
कैद्यांनी तुरुंगातील स्वयंपाकघर आणि बॅरेकमधील सीसी टीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड केली आहे. कॅमेऱ्याची मोडतोड केल्यामुळे मारहाणीचा प्रकार कसा घडला, याचा छडा लावणे कठीण होणार आहे. आक्रमक झालेल्या या कैद्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून कॅमेऱ्याची मोडतोड केली असावी, असा तुरुंग प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. खिळे ठोकलेल्या लाकडीपट्टीने तुरुंग कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. त्यात तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. 

टेरेसचे टाळे तोडले 
टेरेसच्या दरावाजाचे टाळे तोडून महिला कैदी तेथे गेल्याचे कळताच अधिकाऱ्यांनी त्यांना खाली आणले; परंतु काही वेळाने त्यांनी पुन्हा दगडाने टाळे तोडले आणि त्या टेरेसवर गेल्या, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून हाती आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: mumbai news Prisoner Females