हॉटेलातील पार्ट्यांवर उत्पादन शुल्कची नजर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

मुंबई - नववर्षाच्या पूर्वसंध्येला अवैध दारूच्या तस्करीचे प्रकार घडू नयेत, याची खबरदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतली आहे. हॉटेलातील पार्ट्यांपासून गर्च्चीवरच्या पार्ट्यांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. विभागाकडे एकदिवसीय पार्टीकरता 92 अर्ज आले आहेत.

मुंबई - नववर्षाच्या पूर्वसंध्येला अवैध दारूच्या तस्करीचे प्रकार घडू नयेत, याची खबरदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतली आहे. हॉटेलातील पार्ट्यांपासून गर्च्चीवरच्या पार्ट्यांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. विभागाकडे एकदिवसीय पार्टीकरता 92 अर्ज आले आहेत.

शहरात नववर्षाच्या स्वागतानिमित्त गल्लीबोळापासून ते तारांकित हॉटेलामध्ये पार्ट्यांचे आयोजन केले जाते. अनुचित घटना घडू नये म्हणून उत्पादन शुल्क विभाग खबरदारी घेतो. नाताळपासून सुरू होणारे सेलिब्रेशन 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत सुरू राहते. या काळात बनावट मद्य आणि अवैध दारूच्या तस्करीचे प्रकार होतात. असे प्रकार रोखण्याकरिता विभागाने भरारी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. उपनगराचा विचार केला, तर मढ, मार्वे, गोरेगाव संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, दहिसर परिसरात पार्ट्या होतात. कारवाईकरिता मुंबईत 27 पथके तयार केली आहेत. ती हॉटेल ते गल्लीबोळातील पार्ट्यांवर नजर ठेऊन असणार आहेत. गल्लीबोळातील पार्ट्यांची संख्या अधिक असते. 31 डिसेंबरसाठी एक दिवसीय पार्टीकरिता परवाने देण्यात आले आहेत. आतापर्यंत मुंबई आणि उपनगर मिळून 92 पार्टीचे परवाने दिले गेलेत. ही संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. नुकतेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबईत बनावट स्कॉचविक्रीचा पर्दाफाश केला होता.

चिराबाजार येथे कारवाई करून एक लाख 96 हजार 340 रुपयांची बनावट स्कॉच जप्त केली. बनावट स्कॉचप्रकरणी एकाला अटकही करण्यात आली. तसेच नाताळपूर्वी मढ येथे विनापरवाना पार्टी करणाऱ्यावर कारवाई झाली. विनापरवाना पार्टी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. अधिकाऱ्यांनी सापळा रचून 22 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. विभागाने यंदा 28 हजार 826 गुन्हे नोंद करून 16 हजार 552 जणांवर कारवाई केली. तसेच 55 कोटी 80 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बनावट दारूचे प्रकार रोखण्याकरिता 1800-8-333-333 या हेल्पलाईन किंवा 8422001133 व्हॉटसऍपवर माहिती देता येईल. अवैध तस्करीत आढळल्यास तुरुंगवास किंवा दंडही होऊ शकतो, असे दक्षता विभागाचे संचालक सुनील चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: mumbai news production duty watch on hotel parties