वाचनाची कास धरा... यश तुमचेच!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

मुंबई - तुम्ही आपल्या देशाचा आवाज आहात. भविष्यात तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा; मात्र तिथे जाताना वाचनाची कास धरा. मग बघा तुमच्या यशाचा मार्ग सुकर होईल, अशी यशाची गुरुकिल्ली बुधवारी (ता. १९) अभिनेता आणि ‘सकाळ’च्या ज्युनियर लीडर स्पर्धेचा ब्रॅण्ड ॲम्बेसिडर पुष्कर श्रोत्री याने मुलुंड आणि चेंबूरमधील शाळांतील विद्यार्थ्यांना दिली. वैविध्यपूर्ण माहिती वाचण्याची सुवर्णसंधी ‘सकाळ’ने ज्युनियर लीडर उपक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला दिली आहे. त्याचा आवर्जून लाभ घ्या आणि भरपूर बक्षिसे जिंका, असा सल्लाही त्याने मुलांना केला.

‘सकाळ’च्या ‘ज्युनियर लीडर’ स्पर्धेच्या निमित्ताने मुलुंड पूर्वेतील लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज आणि चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या चेंबूर हायस्कूलमध्ये पुष्करने भेट दिली. लक्ष्मीबाई शाळेत पावसाच्या सरींसोबतच विद्यार्थ्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह अनुभवायला मिळाला. शाळेत पुष्करचे धमाकेदार स्वागत झाले. शाळेचे संचालक प्रसाद कुलकर्णी, मुख्याध्यापिका अंजली त्रिपाठी आणि शाळेतील शिक्षिका कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रमाला सुरुवात होताच पुष्करने मुलांच्या मनाचा ताबा घेतला. त्याने आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगत विश्‍वास दिला. तो म्हणाला, की आज मी अभिनयाच्या क्षेत्रात विविध भूमिका करू शकलो आणि देश-विदेशात इंग्रजी नाटकांचे प्रयोग करू शकलो ते फक्त अन्‌ फक्त वाचनामुळेच. तुम्हीही भरपूर वाचा. कोणत्याही क्षेत्रात ‘लीडर’ होण्यासाठी संवादकौशल्य आणि आत्मविश्‍वास हे दोन घटक फार महत्त्वाचे आहेत आणि ते अवांतर वाचनामुळेच साध्य करता येतील. ज्युनियर लीडर स्पर्धेच्या निमित्ताने विविध विषयांची माहिती तुम्हाला मिळेलच. बक्षीस जिंकण्याची संधीही मिळेल. तुम्ही स्पर्धेत आवर्जून भाग घ्या, असे आवाहन पुष्करने केले.

माझ्यातले लहान मूल मी अजूनही जपतोय
हल्ली मुले फार मोठ्या माणसांसारखी वागतात; पण माझे ऐकाल तर लहानांनी लहानांसारखेच वागावे. खेळावे-बागडावे... मस्ती करावी. जोडीला अभ्यासही भरपूर करावा. माझ्यातले लहान मूल मी अजूनही जपतो आहे, असेही पुष्कर श्रोत्री म्हणाला.

‘सकाळ’ नेहमीच मुलांसाठी विविध उपक्रम राबवीत असते. त्याचा मुलांना पुढील जीवनात नक्कीच फायदा होईल. अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी आमच्या मुलांना छान मार्गदर्शन केले. त्याबद्दल आभार.
- अंजली त्रिपाठी (मुख्याध्यापिका, लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कूल)

आमची शाळा मुलांसाठी विविध कौशल्यपूर्ण कार्यक्रम घेत असते. ‘सकाळ’चे उपक्रम खरेच खूप चांगले असून, आम्ही त्यात सातत्याने सहभागी होऊ.
- प्रसाद कुलकर्णी (संचालक, लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कूल)

Web Title: mumbai news Pushkar Shruti sakal student