दिवा-रोहा पॅसेंजरचे रखडगाणे सुरूच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

दिवा - दिवा रेल्वेस्थानकातून सुटणारी दिवा-रोहा पॅसेंजर गाडी रोज उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. गाडी वेळेत सुटत नसल्यामुळे नोकरदारांसह प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यास उशीर होत आहे. गाडीचे रखडगाणे नेहमीचेच झाल्याने संतप्त प्रवाशांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 

दिवा - दिवा रेल्वेस्थानकातून सुटणारी दिवा-रोहा पॅसेंजर गाडी रोज उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. गाडी वेळेत सुटत नसल्यामुळे नोकरदारांसह प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यास उशीर होत आहे. गाडीचे रखडगाणे नेहमीचेच झाल्याने संतप्त प्रवाशांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 

दिवा स्थानकातून रोह्याला जाण्यासाठी दिवसातून किमान पाच; तर रोह्यावरून दिव्याला येण्यासाठी रोज चार गाड्या सुटतात. त्या कधीच वेळेत दिव्यात आणि रोह्याला पोहोचत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. दिव्यातून रोह्याला रात्री आठ वाजता जाणारी गाडी एक तास उशिरा आल्याने ११ जानेवारीला संतप्त प्रवाशांनी दिव्यातील कल्याणकडे जाणारी गाडी रोखून धरून आंदोलन केले होते. अर्धा तास हे आंदोलन सुरू होते. अखेर आरपीएफने हस्तक्षेप करून आंदोलकांना हटवले. त्यानंतरही गाडी वेळेवर येत नसल्याने प्रवाशांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. गाड्या उशिरा धावत असल्याने नावडेला उतरून एमआयडीसीत कामाला जाणाऱ्या प्रवाशांना नेहमीच एक तास उशीर होतो. त्यामुळे काहींच्या नोकऱ्याही गेल्याचे प्रवाशांनी सांगितले. याची गांभीर्याने दखल घेऊन गाडी वेळेत सुटावी, याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

दिव्यातून सकाळी ९.१० च्या डेमो गाडीने मी नेहमी प्रवास करते. मी ठाण्याला राहत असून दिवा-रोहा या गाडीने नावडेला जाते. ही गाडी नेहमी उशिरा येते. कधी वेळेत आलीच, तर मेल आणि एक्‍स्प्रेसमुळे सायडिंगला पंधरा मिनिटे ते अर्धा तास गाडी थांबवली जात असल्यामुळे मला आणि माझ्यासोबत नावडेला कामाला जाणाऱ्या अनेकांना उशीर होतो.
- जयश्री, प्रवासी, ठाणे.

रोह्यावरून रोहा दिवा सायंकाळी ६.०५ ला सुटणाऱ्या गाडीलाही नेहमी उशीर होत असल्यामुळे काही महिलांनी नोकऱ्या सोडल्या. ही गाडी उशिरा आल्याने ती दिव्यात रात्री आठला पोहोचते. तिथून पुढे डोंबिवली, कल्याणे, ठाणेवा मुलुंडला जाण्यास उशीर होतो. 
- कुसुम, प्रवासी, मुलुंड.     

दिव्यातून दिवा-रोहा डेमोने नावडेतील एमआयडीसीमध्ये कामाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असूनही ही सकाळची गाडी नेहमी उशिराच असते. दिवा, ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला वेळोवेळी गाडी उशिरा येते, याबाबतची तक्रार देऊनही काही उपयोग झाला नाही. ही गाडी नेहमी सायडिंगला टाकतात. यावर योग्य कार्यवाही होत नसल्याने आंदोलन करण्याची वेळ आली आहे.  
- विपुल शहा, प्रवासी, डोंबिवली 
            
दिवा-रोहा पॅसेंजर गाडीचे रडगाणे कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. मध्यंतरी प्रवाशांनी रुळावर उतरून आंदोलन केले होते. प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा कळत असेल, तर हे प्रवाशांचे दुर्दैव आहे. प्रशासनाने त्वरित सुधारणा करावी; अन्यथा अशा परिस्थितीत प्रवाशांचा उद्रेक होऊ शकतो.   
- ॲड. आदेश भगत, अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना.

दिवा-रोहा गाडीच्या मार्गावरून लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्‍स्प्रेस जात असल्यामुळे या गाडीला सायडिंगला टाकत असतील; पण नेहमी असे होत असल्यास दिवा स्टेशन मास्तरना यात लक्ष घालण्यास सांगितले जाईल. 
- ए. के. सिंग, पीआरओ, सेंट्रल रेल्वे

Web Title: mumbai news railway Diva-Roha Passenger