पावसामुळे खड्डे अन्‌ डबकी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

विक्रोळी - तीन-चार दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे विक्रोळीतील अनेक रस्त्यांवर डबकी तयार झाली आहेत. काही रस्त्यांवर दुरुस्तीची कामे नीट न झाल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. या डबक्‍यांमुळे अपघातांची शक्‍यता वाढली असल्याने वाहनचालकासह नागरिक त्रस्त झाले आहेत. 

विक्रोळी - तीन-चार दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे विक्रोळीतील अनेक रस्त्यांवर डबकी तयार झाली आहेत. काही रस्त्यांवर दुरुस्तीची कामे नीट न झाल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. या डबक्‍यांमुळे अपघातांची शक्‍यता वाढली असल्याने वाहनचालकासह नागरिक त्रस्त झाले आहेत. 

पावसळ्यापूर्वी शहरातील बहुतांश रस्त्यांची दुरुस्ती केल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत असला तरी पावसामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे दिसत आहे. विक्रोळीतील अनेक रस्त्यांवर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही भागांत तीन दिवसांपूर्वी डांबर टाकून खड्डे बुजवले असतानाही पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरून कन्नमवार नगरमध्ये प्रवेश करताच खड्ड्यांनी सुरुवात होते. गजानन चौक ते विक्रोळी न्यायालय परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याच रस्त्यावर पालिकेचे रुग्णालय असल्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. अशीच परिस्थिती गोदरेज मेमोरियल रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही आहे. इमारत क्रमांक ७८ ते ८० च्या रस्त्याची स्थिती बिकट आहे. पूर्ण रस्त्यावर पाण्याची डबकी भरल्याचे चित्र आहे. स्थानिक लोकांना ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इमारत क्रमांक ३३ च्या समोर मुख्य रस्त्यावर तीन-चार वर्षांपासून एकाच ठिकाणी खड्डा पडतो. परिणामी पावसात मोठे तळे साचते. त्यामुळे वाहनचालकांना प्रामुख्याने दुचाकीस्वारांना जीव धोक्‍यात घालून वाहन चालवावे लागते. याशिवाय कन्नमवार नगर यामधील अंतर्गत भागातही खड्डे पडले आहेत.

कन्नमवार नगरमधील काही रस्ते हे पालिकेच्या सेंट्रल एजन्सीच्या ताब्यात आहेत. मी स्वत: लक्ष घालून खड्डे पडलेले रस्ते दुरुस्त करून घेईन. 
- संतोषकुमार धोंडे, सहायक आयुक्त, एस वॉर्ड 

रिक्षाचालकांना खड्ड्यांचा खूप त्रास होतो. पाठीचे, मणक्‍याचे आजार उद्‌भवतात. पालिकेकडे तक्रार केल्यावर तात्पुरते खड्डे भरले जातात. पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते. पालिकेने यावर कायमस्वरूपी उपाय केला पाहिजे. 
- रमेश साळवे, सरचिटणीस, साई एकता वाहतूक संघटना

Web Title: mumbai news rain pothole