पावसाळी पर्यटन

शामकांत पतंगराव, महेश पवार 
गुरुवार, 6 जुलै 2017

ढग दाटून येतात, मन वाहून नेतात...कुठे तर धबधब्यांकडे. मुंबईच्या जवळ असलेले हे धबधबे आणि तिथला मस्त बेधुंद करणारा परिसर एकदा तरी पाहायलाच हवा... 

आपटे येथील आकर्षक आपटी धबधबा
शहापूर तालुक्‍यातील किन्हवली परिसरात आपटे-टाकीपठार या गावाच्या पठार भागात अतिशय मनमोहक असा आपटी धबधबा आहे. सद्‌गुरू रिद्धीनाथ बाबांच्या टाकेश्वर या समाधीस्थळ असलेल्या डोंगरकड्याच्या पायथ्यापासून आपटी धबधब्याचा उगम झाला आहे. उंच कड्यावरून फेसाळत कोसळणारा धबधबा बघता क्षणीच मनमुराद भिजण्याचा मोह होतो.

एकाच डोंगरकड्यावरून कोसळताना आपटी धबधबा दोन धबधब्यांत विभागतो. चहूकडे रानभाज्यांची रोपे, हिरवी वनश्री व भातलावणीच्या कामात गर्क असलेली कष्टकरी मंडळी, हे दृश्‍य डोळ्यांचे पारणे फेडते.

हा धबधबा एकदम सुरक्षित असून कुठल्याही प्रकारचे दगड कोसळण्याची भीती नाही. लहान मुलेही या ठिकाणी मनमुराद आनंद लुटू शकतात. त्यांच्यासाठी एक छोटा धबधबाही या ठिकाणी आहे. हे ठिकाण टाकी पठारसारख्या आदिवासी पाड्यानजीक असल्यामुळे प्रसिद्धीपासून कायमच दूर राहिले. परंतु आता वीकेंडचे निमित्त साधून शहापूर व मुरबाड तालुक्‍यातील पर्यटक इथे येऊन आनंद लुटतात. 

कसे जाल, काय पाहाल?
शहापूरपासून किन्हवलीमार्गे इथे जाता येते. अंदाजे तीस कि.मी. अंतरावर हे ठिकाण असून चेरवली आपटे टाकीपठार मार्गे एसटी बस किंवा खासगी प्रवासी वाहतूक किन्हवलीपासून उपलब्ध असतात. येथून ४  कि.मी. अंतरावर टाकेश्वर मठ असून प्राथमिक आरोग्य केंद्रही आहे. पर्यटनादरम्यान ससे, मोर व नीलगाई यांचे दर्शन घडू शकते.

काय काळजी घ्याल?
या ठिकाणी मोठी हॉटेल्स नाहीत. त्यामुळे सोबत जेवणाचे डबे असल्यास उत्तम. मोबाईलची रेंज उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------
पर्यटकांना साद घालतोय पलूचा धबधबा 
गेल्या काही दिवसांत मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे पलूच्या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. दामोसा धबधब्याला भेट देणारे पर्यटक आवर्जून पलूच्या धबधब्यालाही भेट देतात, ते तिथल्या निसर्गसौंदर्यामुळे. 

जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. चिखलवाटेची तमा न बाळगता विविध प्रजातींचे रंगीबेरंगी पक्षी पाहत पर्यटक पलूचा धबधबा गाठतात. पर्यटकांबरोबरच पक्षिनिरीक्षक, अभ्यासकही येथे आवर्जून भेट देतात. विक्रमगडमधील शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी सहलीसाठी येथे वर्षातून एकदा तरी भेट दिल्याशिवाय राहत नाहीत. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हजेरी लावणाऱ्या पर्यटकांमुळे येथील ग्रामस्थांना रोजगार मिळतो. या धबधब्याचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा, यासाठी ठोस प्रयत्नांची गरज असून येथील ग्रामस्थ त्याकरिता प्रयत्नशील आहेत. धबधब्याच्या पठारी भागात धरण बांधल्यास हा धबधबा बारमाही वाहू शकतो; तसेच या भागातील जमीन ओलिताखाली येऊन पंचक्रोशीतील भाग सुजलाम, सुफलाम होऊ शकतो. दोन डोंगरांच्या मधोमध पठारी भागामध्ये झालेला धबधब्याचा उगम आणि आजूबाजूची नितांत सुंदर हिरवीगार वनराई यामुळे या धबधब्याला भेट देणे पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते. 

कसे जाल -
विक्रमगडपासून अवघ्या ८ कि.मी. अंतरावर जांभा गावानजीक हे प्रेक्षणीय स्थळ आहे.
------------------------------------------------------------------

चला वरदायिनीचे तुषार झेलायला 
नागोठणे परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे नागोठण्याजवळील सुकेळीचा अर्थात वरदायिनीचा धबधबाही पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. हा धबधबा निसर्गप्रेमींना वर्षा सहलीसाठी जणू निमंत्रण देत आहे. 

मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्वेकडील बाजूस वरदायिनी देवीचे मंदिर असलेल्या वरदायिनी डोंगरावरून कोसळणाऱ्या झाडा-झुडपांतील या नयनरम्य धबधब्याची ‘वरदायिनीचा धबधबा’ ही खरी ओळख आहे. मात्र गेली काही वर्षे त्याला ‘सुकेळीचा धबधबा’ म्हणूनही ओळखले जाते. या धबधब्यावर मुंबईतूनच नव्हे; तर पुण्याचे पर्यटकही येतात. त्यामुळे निवांतपणा हवा असेल तर शनिवार-रविवार आणि सुटीचे दिवस टाळून इथे जायला हवं.

कसे जाल, काय पाहाल? ः 
मुंबई ठाण्याहून येणाऱ्या पर्यटकांसाठी दिव्याहून नागोठण्याला येण्यासाठी सकाळी ६.२० व ९.१० वा. या दोन रेल्वे प्रवासी गाड्या आहेत. नागोठणे स्थानकावर उतरून खासगी रिक्षा वा मिनी डोरने महामार्गावरील सुकेळी गावाच्या पुढे व सुकेळी खिंडीच्या आधी असलेल्या नागोठण्यापासून आठ किलोमीटर अंतरावरील खैरवाडी फाट्यावर उतरून पुढे २५ ते ३० मिनिटे चालत गेल्यावर या धबधब्यावर पोहोचता येते. स्वतःची वाहने असणाऱ्या पर्यटकांनी आपली वाहने थेट खैरवाडी गावाजवळ उभी करून पुढे जावे. खैरवाडी गावातील नागरिक या धबधब्याजवळ जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच तत्पर असल्याचे आपल्यास दिसून येईल. 

काय काळजी घ्याल? 
या धबधब्याजवळ उदरभरणाची कोणतीही व्यवस्था नसल्याने पर्यटकांनी सर्व साहित्य सोबत नेलेलेच चांगले. धबधबा सुरक्षित आहे; मात्र योग्य काळजी घेतलेली उत्तमच.

Web Title: mumbai news Rainy tourism