रविता चालू शकणार नाही !

हर्षदा परब
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

मुंबई - झाडावरून पडलेल्या रविता वळवीचे (वय 10) दुर्दैव असे, की ती आता कदाचित कधीही चालू शकणार नाही. रवितावर उपचार करणारे अस्थिरोग विभागातील शल्यक्रियाविशारद डॉ. धीरज सोनवणे यांनी हे निदान केले आहे.

मुंबई - झाडावरून पडलेल्या रविता वळवीचे (वय 10) दुर्दैव असे, की ती आता कदाचित कधीही चालू शकणार नाही. रवितावर उपचार करणारे अस्थिरोग विभागातील शल्यक्रियाविशारद डॉ. धीरज सोनवणे यांनी हे निदान केले आहे.

रविताच्या मणक्‍यातील दोर (मज्जा रज्जू) तुटला आहे. त्यामुळे तिच्या शरीराचा कंबरेखालचा भाग लुळा पडला आहे. तेथील संवेदना नष्ट झाली आहे. मणक्‍याच्या खाली शस्त्रक्रिया करून मज्जा रज्जूला झालेली गंभीर दुखापत दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल; परंतु रविता चालू शकणार नाही, असे डॉ. धीरज यांनी सांगितले. रवितावर शुक्रवारी (ता. 30) शस्त्रक्रिया होणार आहे. सुमारे तीन ते चार तास ती चालेल. तिला किमान व्हीलचेअरवर बसता यावे, यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. धीरज यांनी सांगितले. रविताच्या शरीरात हिमोग्लोबिन कमी आहे. ती अशक्त आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी तिला रक्त आणि सलाईन चढविण्यात येत आहे.

रविताच्या मूत्राशयाला इजा होऊन तेथील संवेदना नष्ट झाली आहे. तिला लघवीची जाणीव होत नाही. कॅथेटरचा उपयोग होत नसल्याने ते काढण्यात आले आहे. तिला आता डायपर लावण्यात येत आहेत. रविता इतरांप्रमाणे लघवी करू शकणार नाही. तिला कायमस्वरूपी कॅथेटरची गरज भासेल, असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकुंद तायडे यांनी सांगितले.

रविता आणि तिच्या आई-वडिलांशी संवाद साधण्यासाठी रुग्णालयातच तीन दुभाषे सापडले आहेत. त्यापैकी एक ब्रदर, एक फार्मासिस्ट आणि स्टाफ नर्स असल्याचे कळते. यांच्यापैकी एकाच्या माध्यमातून रविताशी संवाद साधण्यात येत आहे.

रविताला मदत करणाऱ्या आणि तिची बोली समजणाऱ्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या लतिका राजपूत आणि योगिनी खानोलकर यांनी रविताची भेट घेऊन तिची विचारपूस केली. रुग्णालयातून आपल्याला जेवण मिळावे, अशी तिची आई शांतीबाई यांची अपेक्षा आहे.

"सकाळ'ने मांडली फरपट
झाडावरून पडल्याने जखमी झालेल्या रविताला घेऊन तिचे आईवडील नंदूरबारच्या दुर्गम भागातून मुंबईत आले. उपचारासाठी दारोदार भटकले. जखमी मुलीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या तिच्या आई-वडिलांची फरपट "सकाळ'ने मांडल्यानंतर तिच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत.

नंदूरबारमधील रविताच्या खडक्‍या या गावात चांगला रस्ता नाही. तिथे फिरण्यासाठी व्हीलचेअरचा फारसा उपयोग होणार नाही. तिचे शाळेत जाणे बंद होणार आहे. तिला तेथे सुविधाही मिळणार नाहीत. त्यामुळे तिच्या पुनर्वसनाचा मुद्दा महत्त्वाचा आहे.
- योगिनी खानोलकर, नर्मदा बचाव आंदोलन

Web Title: mumbai news ravita cannot walk