मुंबई - स्क्रिझोफ्रेनिया आजाराच्या धुंदीत चाकूहल्ला करणाऱ्या पत्नीविरोधात केलेली फौजदारी फिर्याद पतीने मागे घेतली. एवढेच नव्हे, तर तिच्यावर अधिक उपचार करून आयुष्यभर तिची काळजी घेईन, अशी समजूतदार भूमिकाही त्याने मुंबई उच्च न्यायालयात मांडली.
एकमेकांसोबत 15 वर्षे राहणाऱ्या या दांपत्याला स्क्रिझोफ्रेनिया आजारामुळे पोलिस आणि न्यायालयाची पायरी चढावी लागली. मुंबईत टॅक्सीचालक असणाऱ्या पतीवर पत्नीनेच चाकूहल्ला केल्याची घटना गतवर्षी घडली होती; मात्र त्याची पत्नी स्क्रिझोफ्रेनियाने त्रस्त असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या आजाराच्या तणावातूनच तिने पतीवर हल्ला केला होता; मात्र पतीने याप्रकरणी साकिनाका पोलिस ठाण्यात पत्नीच्या विरोधात फौजदारी फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी पत्नीला अटकही केली. ही फिर्याद रद्द करण्यासाठी पत्नीने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. पतीनेही तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 15 वर्षांत पत्नीने कधीही अशा प्रकारचे वर्तन केले नव्हते. आजारामुळे तिने असे कृत्य केले असून तिच्या विरोधातील फिर्याद रद्द करावी, मी तिच्या उपचाराची आणि प्रकृतीची यापुढे व्यवस्थित काळजी घेईन, असे प्रतिज्ञापत्र पतीने न्यायालयात केले आहे.
न्या. आर. एम. सावंत आणि न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने पतीच्या या समजूतदार भूमिकेबाबत समाधान व्यक्त केले. पत्नीच्या काळजीमुळे पतीने घेतलेली समंजस भूमिका कौतुकास्पद आहे. या आजारामुळे आधीच त्यांच्या कौटुंबिक जीवनात ताण निर्माण झाला आहे. फौजदारी कारवाईमुळे तो अधिक वाढवणे योग्य ठरणार नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने पत्नीच्या विरोधातील फिर्याद रद्दबातल केली आणि पत्नीची सुटका करण्याचे आदेश पोलिसांना दिले.
|