रायडर्स देणार स्वच्छतेचा संदेश!

रायडर्स देणार स्वच्छतेचा संदेश!

नवी मुंबई - २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी नवी मुंबईत स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. त्यात अडीच हजार मोटरसायकलस्वार (रायडर्स) सहभागी होतील, असा विश्‍वास महापालिकेने व्यक्त केला आहे. शहरातील गावठाणे आणि झोपडपट्टीतून ही रॅली फिरणार असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न केला जाणार आहे. 

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन व राज्य सरकारच्या स्वच्छ महाराष्ट्राच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणासाठी नवी मुंबई शहर आता सज्ज झाले आहे. शहराच्या सर्वच भागांत स्वच्छतेवर भर दिल्यानंतर स्वच्छतेच्या जनजागृतीवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. स्वच्छता सर्वेक्षणात महत्त्वपूर्ण मानला जाणारा ॲप्स डाऊनलोड व दूरध्वनी क्रमांकावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नांची जास्तीत जास्त अचूक उत्तरे देण्यासाठी जनजागृती केली जात आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. दिघ्यातील पटनी मैदानापासून ही रॅली सुरू होणार असून गावठाण व झोपडपट्टी भागातून मार्गक्रमण करीत महापालिका मुख्यालयासमोर तिची सांगता होणार आहे. पटनी मैदानापासून महापे, पावणे, तुर्भे, फायझर रोडमार्गे ही रॅली गावठाणांतूनही फिरणार आहे. महापालिका शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छतेबाबत जनजागृती करत आहे; परंतु झोपडपट्टी व गावठाणांतही अधिकाधिक स्वच्छता व जनजागृती होणे गरजेचे असल्याने या रॅलीतून जनजागृतीचा प्रयोग केला जाणार आहे. या रॅलीत सहभागी होणारा बाईकस्वार पाठीवर स्वच्छता सर्वेक्षणाचा संदेश देत शहरभर फिरणार आहे. ही रॅली ज्या-ज्या भागांतून महापालिका मुख्यालयाच्या दिशेने जाईल, त्या भागात ॲप्स डाऊनलोड व दूरध्वनीवरून विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नांची अचूक उत्तरे देण्यासाठी माहिती दिली जाणार आहे. २४ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी यापूर्वीच हे ॲप्स डाऊनलोड केले आहे. देशभरातील टॉप २० शहरांच्या यादीत नवी मुंबईचे नाव दोन वेळा येऊन गेले आहे. याला गावठाण व झोपडपट्टीतील नागरिकांचाही हातभार लागावा, यासाठी स्वच्छतेबाबतच्या पायाभूत सुविधा दिल्या जात आहेत. 

विक्रमाची नोंद?
स्वच्छता सर्वेक्षणासाठी काढण्यात येणाऱ्या मोटरसायकल रॅलीत अडीच हजार दुचाकीस्वार सहभागी होण्याचा अंदाज महापालिकेने वर्तवला आहे; मात्र त्यापेक्षा जास्त जण सहभागी करून घेत अधिकाधिक लोकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्याचा व गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न रॅलीत सहभागी होणारे तरुण करणार आहेत.

स्वच्छता सर्वेक्षणात सर्व नवी मुंबईकरांनी सहभागी व्हावे, याकरता महापालिका मोटरसायकल रॅलीचे आयोजन करणार आहे. शहरातील गावठाण व झोपडपट्टी भागात अधिक जनजागृती होऊन त्यांचाही स्वच्छतेत सहभाग वाढावा यासाठी रॅलीचे आयोजन केले आहे. यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे.  
- अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com