रिझवान सिद्दिकी यांच्या अटकेची कागदपत्रे दाखल करण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

मुंबई - अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकीच्या सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) प्रकरणात वकील रिझवान सिद्दिकी यांच्या अटकेसंबंधित सर्व कागदपत्रे दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज ठाणे पोलिसांना दिले. सिद्दिकी यांना ठाणे गुन्हे शाखेने कोणतीही पूर्वसूचना न देता अटक केली आहे, अशी तक्रार करणारी हेबिअस कॉर्प्सची याचिका सिद्दिकी यांच्या पत्नीने केली आहे. या याचिकेवर न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली.

नवाझुद्दीनच्या पत्नीच्या सीडीआरसंबंधी चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सिद्दिकी यांना साक्षीदार समन्स बजावले होते. मात्र त्या वेळेस ते मुंबईबाहेर असल्यामुळे ते उशिराने चौकशीला हजर झाले. त्यानंतर त्यांचा जबाबही नोंदविण्यात आला. त्यांनी याबाबत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्यालाही माहिती दिली. मात्र पुन्हा त्यांना चार दिवसांपूर्वी चौकशीसाठी बोलावण्यात आले आणि चौकशीमध्येच त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अटक केली, असा दावा याचिकेत केला आहे. न्यायालयाने अटकेसंबंधी सर्व कागदपत्रे दाखल करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले असून, पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.

Web Title: mumbai news rizwan siddiqui arrest document crime