नवी मुंबईतील रस्ते होणार चकाचक

नवी मुंबईतील रस्ते होणार चकाचक

नवी मुंबई - नागरिकांना विनाअडथळे रस्ते व पदपथ मिळावेत, यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून वॉकेबिलिटीअंतर्गत विकासकामांवर भर देण्यात येणार आहे. शहरातील रस्ते, पदपथ, पावसाळी गटारे अशा विकासकामांसाठी तब्बल १४ कोटींची कामे महासभेच्या पटालावर आली आहेत. नेरूळ, बेलापूर, दिघा, ऐरोली, कोपरखैरणेसह ठाणे-बेलापूर मार्गावरही वॉकेबिलिटी अंतर्गत विकासकामे करण्यात येणार आहेत. 

महापालिका हद्दीत नागरिकांनी वैयक्तिक वाहनांचा कमीत कमी वापर करून अधिकाधिक सार्वजनिक वाहने व पदपथांचा वापर करावा, यावर तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भर दिला होता. सर्व नागरिकांनी जवळच्या अंतरासाठी चालण्याचा मार्ग अवलंबला, तर शहरात पार्किंग व वाहतूक कोंडीची समस्या उरणार नाही, अशी त्यांची कल्पना होती; परंतु यासाठी शहरात सुटसुटीत पदपथ, सुसज्ज रस्ते व स्वच्छ गटारांची गरज होती. अडथळेरहीत पदपथांवर भर देण्यासाठी वॉकेबिलिटी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी सुरुवात केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर शहरातील अंतर्गत विकासकामे आता महासभेच्या पटलावर आली आहेत. यात बेलापूर सेक्‍टर १९, २०, २१, २२, आम्र मार्गासह नेरूळ सेक्‍टर २१, २३, २५, २७, सीबीडी सेक्‍टर १ ते १०, नेरूळ सेक्‍टर २८, ३६, ४० ते ५०, कोपरखैरणे, दिघा व ऐरोली विभागात पदपथावर झाकणे बसवणे, सर्कलकरिता लोखंडी ग्रील, फूटपाथवरून सहजरीत्या उतरण्यासाठी रॅम्प, बॅरिअर फ्री पदपथ तयार करणे अशी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

ठाणे-बेलापूर रस्त्यावर पदपथ
ठाणे-बेलापूर मार्गावर नागरिकांसाठी दोन हजार ६७० मीटर लांबीचा व १.२० मीटर रुंदीचा पदपथ बांधण्यात येणार आहे. १९५ मीटरचा लांबीचे पावसाळी गटार तयार करणे, रंगकाम अशी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. महासभेच्या मंजुरीसाठी अभियांत्रिकी विभागाकडून ही कामे पटलावर प्रस्तावित करण्यात आली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com