गणेशोत्सवापूर्वी रस्तेदुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

कल्याण - मागील वर्षापेक्षा यंदा रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडत असून शहरातील रस्ते खराब झाले आहेत. रस्त्यांवरील खड्डे खडी टाकून बुजवले जात आहेत; मात्र पावसात ते टिकत नसून त्याला पर्यायही नाही. गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते चकाचक दिसतील, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त पी. वेलारसु यांनी दिली. 

कल्याण पूर्वमधील पूना लिंक रोड, हाजी मलंग रोडसह अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले आहेत. धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपुलावरही खड्डे पडले असून कल्याण-पश्‍चिम, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीतील प्रमुख रस्त्यांची चाळण झाली आहे. याकडे पालिका आयुक्त पी. वेलारसु यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, मागील वर्षापेक्षा यंदा मुसळधार पाऊस सुरू आहे. पाऊस सुरू असताना खड्डे बुजवणे म्हणजे खर्च वाया घालवणे आहे म्हणून जे महत्त्वाचे रस्ते आहेत, ते दुरुस्त करण्याचे प्रयत्न केले; मात्र पावसाने आणखी खड्डे झाल्यामुळे आता खडी टाकण्यात येत आहे.गणेशोत्सवापूर्वी रस्ते चकाचक करा, असे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत. सर्व सरकारी आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून नदी, नाले आणि सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

फेरीवालाप्रश्‍नी लवकरच आराखडा
कल्याण रेल्वेस्थानक परिसर आणि स्कायवॉक फेरीवालामुक्त व्हावा, यासाठी कारवाई सुरू आहे; मात्र पुन्हा फेरीवाले बसत असल्याने आता कठोर निर्णय घेऊन ते बसणार नाहीत, यासाठी लवकरच आराखडा बनवू, असे पालिका आयुक्त पी. वेलारसु यांनी सांगितले. 

कचराप्रश्‍नी काम सुरू 
केडीएमसी परिसरातील कचरा प्रश्‍न गंभीर आहेच; मात्र मी पदभार घेतल्यापासून कचराप्रश्‍नी दोन वेळा आढावा बैठक घेतली आहे. नियोजन आखून दिले असून काही ठिकाणी काम सुरू आहे. यापुढे तक्रारी आल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पी. वेलारसु यांनी दिला.

Web Title: mumbai news Road maintenance Ganeshotsav