पालिकेचे दुर्लक्ष रस्त्याची कामे अर्धवटच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

मुंबई - रस्तेदुरुस्तीच्या कामासाठी पालिकेने ३१ मे ही अंतिम तारीख कंत्राटदारांना दिली होती. मुदतीपूर्व रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे आदेशही पालिकेकडून देण्यात आले होते. मात्र शहरातील अनेक ठिकाणी अद्यापही रस्तेदुरुस्तीची कामे चालू असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे; तर अनेक ठिकाणी ३१ मेपासून रस्तेदुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पावासाळ्यात रस्त्यांची अधिकच दुरवस्था होऊन नागरिकांचे हाल होण्याची शक्‍यता आहे. रस्तेदुरुस्तीअभावी रस्त्यांवर पाणी साचून खड्डे पडणे, वाहतूक कोंडी होणे, नागरिकांना चालणे अवघड होणे यासारख्या समस्यांचा सामना मुंबईतील नागरिकांना होण्याची शक्‍यता आहे.

वडाळा ब्रिज मार्गाचे सहा महिन्यांपासून काम सुरू
वडाळा येथील नाथालाल मेहता पुलापासून वडाळा ब्रिज मार्गावर रस्तादुरुस्तीचे बांधकाम सहा महिन्यांपासून सुरू आहे. अँटॉप हिल, प्रतीक्षानगर, बरकतअली नाका, बीपीटी कंटेनर या मार्गाला हा  मार्ग जोडलेला आहे. वाहतुकीसाठी वडाळ्यातील हा मुख्य मार्ग असल्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी येथील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होणे गरजेचे आहे.       

रस्ता रुंदीकरण अर्धवटच
शिवडी - येथील शिवडी नाका टी. जे. रोडवर रस्ता रुंदीकरणाचे बांधकाम महापालिका एफ दक्षिण विभागाकडून पाच महिन्यांपासून सुरू आहे. अद्याप काम पूर्ण न झाल्याने या मार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. पावसाळ्यात या मार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांच्या त्रासात वाढच होणार आहे.

धारावीत रस्ते नादुरुस्ती
धारावी - पावसाळा तोंडावर आला तरीही धारावीतील अनेक रस्ते नादुरुस्त आहेत. धारावीतील गल्ल्यांमधील अनेक रस्त्यांवरील पेव्हर ब्लॉक उखडलेले आहेत. चौकामधील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. रस्त्यावर पाणी साचल्यास वाहतूक कोंडी होऊन त्याचा त्रास वाहनचालक व पादचाऱ्यांना होण्याची शक्‍यता आहे. वेळीच रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी धारावीत जोर धरीत आहे.

Web Title: mumbai news Road works municipal corporation