कल्याण: सभागृह छत कोसळल्याची अतिरिक्त आयुक्तांद्वारे चौकशी

सुचिता करमरकर
गुरुवार, 13 जुलै 2017

मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेने पालिकेच्या कामकाजाची तसेच त्याच्या दर्जाबाबतची चर्चा सुरु आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत तसेच शहर अभियंता सुनिल जोशी यांनी या जागेचा पंचनामा केला आहे. ही घटना कशी घडली? त्याची कारणे काय आहेत? तसेच यामुळे सभागृहाचे नेमके किती नुकसान झाले? याची माहिती घेतली जात आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्वा. सावरकर सभागृहाचे छत कोसळल्या प्रकरणाची चौकशी करुन येत्या आठ दिवसात त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्त पी. वेलारसू यांनी दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त संजय घरत या प्रकरणाची चौकशी करतील. दरम्यान या घटनेत नेमके किती नुकसान झाले आहे याची मोजदाद करण्यात येत आहे.

मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेने पालिकेच्या कामकाजाची तसेच त्याच्या दर्जाबाबतची चर्चा सुरु आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत तसेच शहर अभियंता सुनिल जोशी यांनी या जागेचा पंचनामा केला आहे. ही घटना कशी घडली? त्याची कारणे काय आहेत? तसेच यामुळे सभागृहाचे नेमके किती नुकसान झाले? याची माहिती घेतली जात आहे. सभागृहातील पीओपी पडल्याने आसन व्यवस्थेचेही नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरा यांचीही मोडतोड झाली आहे. या सभागृहाच्या उभारणीस तसेच त्यानंतर केलेल्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रशासनाने किती खर्च केला याची माहिती काढण्यात येत आहे. त्यानंतरच  नुकसानीचा आकडा समजू शकेल.

यापुढील सर्व साधारण सभा घेण्यात या घटनेमुळे अडचण होणार आहे. पालिकेचे 127 सदस्य, पालिका अधिकारी तसेच कर्मचारी यांची उपस्थिती लक्षात घेत पालिकेच्या अन्य वास्तूत सभा घेण्याच्या पर्यायाचा आता विचार करावा लागेल. पालिकेच्या अत्रे रंगमंदिराचेही देखभाल दुरुस्तीचे काम सुरु असल्याने डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा पर्याय पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय महापौरांचा असेल. 

Web Title: Mumbai news roof collapse in Kalyan