चमचमत्या ताऱ्यांचा आनंदसोहळा!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

'सकाळ प्रीमियर ऍवॉर्डस'च्या दिमाखदार सोहळ्यात अवतरले तारांगण

'सकाळ प्रीमियर ऍवॉर्डस'च्या दिमाखदार सोहळ्यात अवतरले तारांगण
मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ-कलाकारांसोबतच बॉलिवूडच्या नामांकित तारे-तारकांच्या उपस्थितीत रंगलेल्या पहिल्यावहिल्या "सकाळ प्रीमियर ऍवॉर्डस'च्या दिमाखदार सोहळ्याने प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिर गुरुवारी (ता. 10) रात्री उजळून गेले होते. कॅमेऱ्यांच्या चमचमाटात आणि टाळ्यांच्या गजरात विजेत्यांची नावे घोषित होत होती, तसतसा सभागृहातील कल्ला वाढतच होता... विजेत्यांचे चेहरे चमकत होते अन्‌ त्यांच्यावर होत असलेल्या अभिनंदनाच्या वर्षावात अवघे नाट्यगृह न्हाऊन निघाले.

जुही चावला, प्रीती झिंटा, रवीना टंडन, विवेक ओबेरॉय, सोनाली कुलकर्णी आदी बॉलिवूड स्टारबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतील सचिन पिळगावकर, महेश कोठारे, सुबोध भावे, सुशांत शेलार, वंदना गुप्ते, आदेश बांदेकर, जितेंद्र जोशी, विजय चव्हाण, विजय पाटकर, भरत दाभोळकर, रवींद्र बेर्डे आदी मान्यवरांसोबत अवघे तारांगणच रवींद्र नाट्यमंदिरात अवतरले होते. पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स पुरस्कार सोहळ्याचे प्रायोजक आहेत; तर गणराज असोसिएट्‌स सहप्रायोजक आहेत.

कार्यक्रमाची सुरवात कवी सौमित्र यांनी रचलेल्या सकाळ प्रीमियर ऍवॉर्डस टायटल सॉंगने झाली. मिलिंद इंगळे यांनी गायलेल्या या गाण्याने सूरमयी सोहळ्याची झलक पेश केली. पुष्कर श्रोत्री व सिद्धार्थ चांदेकर यांच्या नर्मविनोदी सूत्रसंचालनाने सभागृहात हास्यस्फोट होत असतानाच अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने प्रत्येक विविध गाण्यांवर नृत्यप्रकार सादर करून रसिकांना खिळवून ठेवले. तिच्या नृत्याचा पारंपरिक साज लाजबाब होता. पुरस्कार वितरणाला सुरवात होताच टाळ्यांच्या कडकडाटासह विजेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. "सकाळ प्रीमियर ऍवॉर्डस'चे आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सर्व विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

चित्रपटसृष्टीत 1 मे 2016 ते 30 एप्रिल 2017 या कालावधीतील वर्चस्व गाजवलेले 30 चित्रपट पुरस्काराच्या स्पर्धेत होते. समाजमनावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या चित्रपटांचा सोहळ्यात "सकाळ'तर्फे विशेष गौरव करण्यात आला. पुरस्कार सोहळ्याचे ते वैशिष्ट्य ठरले.

मनोरंजन क्षेत्रासाठी मराठीतील एकमेव ग्लॅमरस मासिक असा "प्रीमियर'चा नावलौकिक गुरुवारच्या सोहळ्यातही दिसून आला. मानाच्या अशा अनुपम सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील तारांकित चेहरे आवर्जून उपस्थित होते. मराठी सोहळ्यात फारसे न दिसणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारही "प्रीमियर'ला दाद देण्यासाठी आणि विजेत्यांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. अभिनयाव्यतिरिक्त सामाजिक बांधिलकी जपणारा अभिनेता विवेक ऑबेरॉय याच्या कार्याची दखल घेऊन त्याला सोहळ्यात सोशल इम्पॅक्‍ट पुरस्कार देऊन विशेष गौरविण्यात आले. एकाच चित्रपटसृष्टीत काम करीत असले तरी आपल्या व्यग्र वेळापत्रकामुळे एकमेकांना भेटू न शकलेले सेलिब्रिटी अचानक झालेल्या गाठीभेटीने हरखून गेले. एकमेकांना आलिंगन देत विचारपूस अन्‌ हास्यविनोदांची उधळण करीत सर्वांनी सोहळ्याची संध्याकाळ एन्जॉय केली. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या सोहळ्यात हास्यविनोदाची तुफान फटकेबाजी झालीच, त्याचबरोबर पुरस्कारांचा वर्षाव झाल्याने मराठी सेलिब्रिटी वेगळ्याच समाधानाने हरखून गेले होते.

Web Title: mumbai news sakal premier awards event