पाऊस लांबल्याने दुबार पेरणीचे सावट

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 जुलै 2017

धरण क्षेत्रात मात्र जलसाठा वाढला

धरण क्षेत्रात मात्र जलसाठा वाढला
मुंबई - यंदा वेळेवर मॉन्सूनचे आगमन झाले असले तरीही राज्यातील सर्व जिल्ह्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळ जवळ पन्नास टक्‍के इतका कमी पाऊस पडला आहे. मात्र याच कालावधीत सर्व प्रकारच्या जलाशय क्षेत्रांत गेल्या वर्षीच्या तुलनेत दमदार पाऊस पडल्याने धरणातील साठ्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या राज्यात 40 टक्‍क्‍यांच्या आसपास पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून, सरकार हवालदिल झाले आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात 421 मि.मी. पाऊस पडला होता. यंदा केवळ 218.5 मि. मी. पाऊस जून महिन्यात पडला आहे. छोटे, मध्यम व मोठ्या प्रकल्पांत गेल्या वर्षी 20.65 टक्‍के पाणी होते. तर यंदा हे प्रमाण 24.41 टक्‍के आहे. जून महिन्यानंतर पाऊस लांबला आहे. लांबलेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे सावट उभे राहिले आहे.

राज्यातील सहा विभागांतील सर्व प्रकारच्या जलाशयांत गेल्या वर्षी याच कालावधीत 20.65 टक्‍के इतका साठा होता. यावेळी तो 24.41 टक्‍के इतका वाढला आहे. याचे कारण म्हणजे प्रकल्पक्षेत्रांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे ही समधानाची बाब आहे. त्यामुळे कोकणातील सर्व प्रकल्पांत जूनअखेर सरासरी 63 टक्‍के जलसाठा आहे.

मोठे प्रकल्प गेल्या वर्षी या कालावधीत 21.88 टक्‍के भरले होते. तर यंदा 25.55 टक्‍के, मध्यम प्रकल्प गेल्या वर्षी 26.08 टक्‍के तर यंदा 26.97 टक्‍के तर मोठ्या प्रकल्पांत गेल्या वर्षी 10.31 टक्‍के तर यंदा 16.95 टक्‍के साठा होता. गेल्या वर्षी तिन्ही प्रकारच्या प्रकल्पांत 20.65 टक्‍के तर यंदा 24.41 टक्‍के इतका साठा आहे.

दरम्यान, पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, तर दुबार पेरणीसाठी सरकार आव्हान स्वीकारण्यास सज्ज आहे, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी म्हटले आहे.

Web Title: mumbai news second time drought sowing by rain