कैदी महिलेवर पोलिसांचे लैंगिक अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

मुंबई - भायखळा तुरुंगात अचानक मृत्यू झालेल्या मंजुळा शेट्ये या कैदी महिलेवर पोलिसांनी लैंगिक अत्याचार केले होते, असा खळबळजनक दावा बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयात शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने केला. ही घटना आपण पाहिली असल्याचे इंद्राणीने सांगितल्यावर तिला तुरुंगातील पोलिसांविरोधात फिर्याद दाखल करण्याची परवानगी न्यायालयाने दिली. 

मुंबई - भायखळा तुरुंगात अचानक मृत्यू झालेल्या मंजुळा शेट्ये या कैदी महिलेवर पोलिसांनी लैंगिक अत्याचार केले होते, असा खळबळजनक दावा बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयात शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने केला. ही घटना आपण पाहिली असल्याचे इंद्राणीने सांगितल्यावर तिला तुरुंगातील पोलिसांविरोधात फिर्याद दाखल करण्याची परवानगी न्यायालयाने दिली. 

चार दिवसांपूर्वी मंजुळाचा तुरुंगात पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. त्या वेळी तुरुंगातील अन्य शेकडो कैदी महिलांनी निषेध आंदोलन केले होते. नागपाडा पोलिसांनी याबद्दल इंद्राणीसह अन्य काही जणींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यामुळे इंद्राणीने थेट न्यायालयात मंजुळाच्या मृत्यूचे प्रकरण तक्रारीद्वारे दाखल केले. बुधवारी न्या. जे. सी. जगदाळे यांच्यापुढे इंद्राणीला हजर करण्यात आले. मंजुळाच्या मृत्यूच्या दिवशी घडलेल्या घटनांची माहिती तिने न्यायालयाला दिली. मंजुळाला शुक्रवारी दुपारी पोलिसांनी मारहाण केली होती आणि मी त्याची साक्षीदार आहे. त्या वेळी मी माझ्या बराकीत होते. तिला जमिनीवरून फरपटत नेत मारहाण केली जात होती. तिच्या गळ्याभोवती साडी होती आणि तिचेही केसही पोलिस ओढत होते, असा आरोप तिने केला. तिला विवस्त्र करून आणि तिच्या गुप्तांगामध्ये रॉड टाकून मारहाण केल्याची माहितीही कुणीतरी मला दिली. थोड्या वेळाने पुरुष पोलिसांनी तिला रुग्णालयात नेले, असेही सांगण्यात आले. 

दुसऱ्या दिवशी मी तिच्याविषयी एका सुरक्षा रक्षक महिलेकडे चौकशी केली; मात्र नंतर मंजूचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. त्यामुळे सर्व कैदी महिला धास्तावल्या आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे निषेध आंदोलन केले, अशी माहिती इंद्राणीने दिली. मंजुळाच्या मृत्यूबाबत दंडाधिकाऱ्यांकडे मी फौजदारी दंडसंहिता 164 नुसार जबाब देईन, असे मी सांगितले. माझ्याबरोबर आणखीही काही जणींना जबाब द्यायचा आहे; पण असे सांगितल्यावर पोलिसांनी मलाही धमकावले आणि लैंगिक अत्याचार करण्याची धमकी दिली, असा आरोप इंद्राणीने केला. कैद्यांनी आंदोलन केल्यावर पोलिसांनी वीजपुरवठा बंद करून त्यांच्यावर लाठीमार केला. या वेळी माझ्या हाताला आणि डोक्‍याला गंभीर जखमा झाल्या. तुला साक्षीदार बनायचे आहे ना, मग तुलाही तिच्यासारखेच मारणार, असे त्यांनी मला धमकावले, असे तिने सांगितले. 

नागपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवणार 
इंद्राणीचा जबाब ऐकल्यावर न्यायालयाने तिला पोलिसांकडे तक्रार करण्याबाबत विचारले. त्यावर तिने होकारार्थी उत्तर दिले. पोलिसांनी इंद्राणीची वैद्यकीय तपासणी तातडीने करावी आणि तिला नागपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी न्यावे आणि दंडाधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.

Web Title: mumbai news Sexual torture of the prisoner on the woman