शहापुरात खड्ड्यात बसून आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

शहापूर - शहापूर तालुक्‍यातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले असून, हे खड्डे तातडीने बुजवावेत. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या ठाणे ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे आणि सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा खाडे यांनी मंगळवारी (ता. २५) खड्ड्यात बसून आंदोलन केले.

तालुक्‍यातील आणि शहरातील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना येथून चालणेही कठीण झाले आहे. वाहनचालकांच्या मणक्‍याचे विकार वाढले असून, वाहनांच्या दुरुस्तीतही वाढ होत आहे. हे खड्डे तातडीने भरून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. २०१३ पासून आतापर्यंतच्या सर्व रस्त्यांची दक्षता विभाग आणि सीआयडीमार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी विद्याताई वेखंडे आणि अपर्णा खाडे यांनी अनोखे आंदोलन केले. पोलिस निरीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागास याबाबतचे निवेदन दिले. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बिलगोजी यांनी गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरून रस्ते सुस्थितीत केले जातील, असे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

बांधकाम विभागाला रंग भेट 
शहापूर शहरातील डीवायडरांना रंग न दिल्यामुळे अपघात वाढत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने डिवायडर रंगवावेत, यासाठी आंदोलकांनी विभागाला चक्क रंग भेट दिला; तसेच गणपती आगमनापूर्वी खड्डे न भरल्यास गणेश विसर्जन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात करू, असा इशारा अपर्णा खाडे यांनी दिला.

Web Title: mumbai news shahapur pothole