शेतकरी लाभार्थी नव्हे तर "अपमानित'  - शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

मुंबई - ""नोटाबंदी व वस्तू व सेवाकरामुळे "जीएसटी'ने देशभरात महामंदी व महागाईचे संकट असताना राज्यातल्या शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी करीत फडणवीस सरकारने अपमानित केले आहे. तरीही मी लाभार्थी अशी प्रचंड जाहिरातबाजी करत असून, सत्तेच्या खुर्चीत बसलेलेच खरे लाभार्थी आहेत,'' अशी कठोर टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

मुंबई - ""नोटाबंदी व वस्तू व सेवाकरामुळे "जीएसटी'ने देशभरात महामंदी व महागाईचे संकट असताना राज्यातल्या शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी करीत फडणवीस सरकारने अपमानित केले आहे. तरीही मी लाभार्थी अशी प्रचंड जाहिरातबाजी करत असून, सत्तेच्या खुर्चीत बसलेलेच खरे लाभार्थी आहेत,'' अशी कठोर टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

कर्जत (जि. रायगड) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिंतन शिबिराचा समारोप करताना पवार यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. नोटाबंदीने देशात आर्थिक मंदी व बेरोजगारी वाढल्याची आकडेवारी सादर करत मोदी सरकारच्या मनमानी आर्थिक धोरणांबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. पवार म्हणाले, ""राज्यात व देशात स्पष्ट बहुमताचे सरकार आहे. यापूर्वी देशात अनेक बदल पाहिले. अनेक पंतप्रधान झाले; पण ते अल्पकाळ होते. वाजपेयी पंतप्रधान झाले. वेगवेगळे पक्ष होते; पण अटलजींचा स्वभाव सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा होता. तरीही "इंडिया शायनिंग'च्या नावाखाली केलेल्या प्रचंड जाहिरातीमुळे 2004 मध्ये अनपेक्षित बदल झाला.'' 

""आता मोदींचे सरकारदेखील केवळ जाहिरातींचा मारा करत आहे. चुकीची आर्थिक धोरणे व विरोधकांवर धास्तीचे सावट ठेवून एककेंद्री सत्ता राबवत आहे. अशी केंद्रित सत्ता भ्रष्टाचाराचे साधन बनते आणि आज देश त्याच रस्त्याने जात आहे,'' अशा शब्दांत पवार यांनी मोदी सरकारवर टीकास्र सोडले. नोटाबंदी व "जीएसटी'मुळे व्यापारी वर्गात मोदी सरकारबाबत प्रचंड संताप असून कारखानदारी मंदावली आहे. गुंतवणूक होत नाही. मंदीचा फटका बसल्याने बेरोजगारी वाढत आहे. शेकडो कंपन्यांत कामगार कपात सुरू आहे. तरीही सर्व काही आलबेल असल्याच्या जाहिराती करणारे हे सरकार बेशरम असल्याचा टोलाही पवार यांनी लगावला. 

सरकारी खर्चातून पक्षाचा प्रचार 
राज्य सरकार सरकारी तिजोरीतून खर्च करून स्वत:च्या पक्षाचा प्रचार करत असल्याचा आरोप करत पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात खासगी अधिकाऱ्यांची भरती कशासाठी, असा सवाल केला. खासगी अधिकाऱ्यांची नावे घेत त्यांना दिला जाणारा पगारदेखील पवार यांनी या वेळी सांगितला. मुख्यमंत्री कार्यालयात बसून हे अधिकारी भाजपचा प्रचार करत आहेत. त्यांना प्रत्युत्तर देणाऱ्या युवकांना खोट्या तक्रारीत अडकवले जात आहे. हे काय कायद्याचे राज्य आहे, असा सवाल त्यांनी केला.

Web Title: mumbai news sharad pawar famer