कोविड नियमांची ऐसी तैसी, शेयर रिक्षा, टॅक्सी चालकांची अरेरावी सुरु

कोविड नियमांची ऐसी तैसी, शेयर रिक्षा, टॅक्सी चालकांची अरेरावी सुरु

मुंबई: कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही, मुंबईत दिवसाला सरासरी हजारच्या वर कोरोना रुग्ण निघत आहे. मात्र या परिस्थितीत शेयर रिक्षा टॅक्सी चालकांकडून सर्रास कोविड 19 च्या नियमांचे उल्लंघन करणे सुरु आहे. टॅक्सीचालक सर्रास जादा प्रवाशांची वाहतूक करत आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी शेयर रिक्षा, टॅक्सी संघटनांना भाडे दर निश्चित करून दिले असतानाही, ऐन कोरोना काळातही प्रवाशांची सर्रास लूट करत असल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, शिवडी, मुंबई सेंट्रल, नवी मुंबईतील खारघर यासह अनेक ठिकाणावरून शेयर टॅक्सीचालक प्रवाशांकडून जादा भाडे वसूल करत आहेत.  ठाणे, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस येथील शेयर रिक्षा चालकांकडून अतिरिक्त भाडे वसूल करण्याचा प्रकार सुरु आहे. प्रवाशांनी अतिरिक्त भाडे देण्यास नकार दिल्यास प्रवाशांना रिक्षातून खाली उतरवण्यापर्यंत मजल या टॅक्सीचालकांची झाली आहे. या प्रकाराची तक्रार अनेक प्रवाशांनी केली. मात्र आरटीओ आणि वाहतूक पोलिस विभागाकडून कारवाईच होत नसल्याने प्रवाशांना  रिक्षा, टॅक्सी चालकांची मुजोरी सहन करण्याशिवाय काही पर्याय नाही.

नुकतीच रिक्षा, टॅक्सीला खटूवा समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ राज्य सरकारने घोषित केली आहे. तर 1 मार्च पासून मुंबई महानगरात नवीन भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. मात्र अद्याप शेयर रिक्षा टॅक्सीच्या भाडेवाढी संदर्भात अधिकृत कोणतीही घोषणा झाली नाही. मात्र शेयर रिक्षा टॅक्सी चालकांनी मर्जीप्रमाणे भाडे वाढ केल्याचे दिसते आहे.

शेयर टॅक्सीला चालकासह एकूण 7 प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी आहे. मात्र, कोविड नियमांना फाटा चालकांसह 9 ते 10 प्रवाशांची वाहतूक सर्रास केली जात आहे. त्यामुळे टॅक्सीत खचाखच गर्दी झाल्यामुळे कोरोना संसर्ग फैलावण्याची भीती आहे. 

शेयर रिक्षा, टॅक्सी अद्याप बेकायदेशीर

लॉकडाऊन नंतर राज्य सरकारने मिशीन बिगेन अगेन अंतर्गत शासकीय कार्यालय, निवडक वाहतूक सेवा सुरू करण्याची मंजुरी दिली, त्यामध्ये अद्याप शेयर रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवासी वाहतुकीला राज्य सरकारने परवानगी दिली नाही. तरीसुद्धा मुंबई महानगरात सर्रास शेयर रिक्षा, टॅक्सी सुरू आहे.

एकतर पेट्रोल, सीएनजी दर वाढले आहे. त्यामध्ये शेयर टॅक्सी प्रवासासाठी एक पर्याय आहे. मात्र, टॅक्सी चालक  मनमर्जी भाडे घेतात, इको शेयर टॅक्सी मध्ये भरगच्च प्रवासी बसवत असल्याने कोरोना संसर्गाची सतत भीती वाटते. याची तक्रार तरी कुठे करायची हे माहिती नसल्याने शेयर टॅक्सी चालकांची प्रचंड मुजोरी वाढली आहे.
विलास मोरे, प्रवासी

हेही वाचा- Corona Vaccination: ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी 'या' क्रमांकावर साधा संपर्क

शेयर टॅक्सी चालकांकडून जादा प्रवासी आणि अतिरिक्त भाडे वसुली केली जात असल्यास नागरिकांनी आरटीओ विभागात तक्रारी कराव्या, शिवाय अशा शेयर टॅक्सी चालकांवर कारवाई केली जाईल.
प्रदीप शिंदे, आरटीओ, ताडदेव

परिवहन विभागाकडून जादा प्रवासी वाहतूक आणि अतिरिक्त भाडे वसुलीवर नेहमीच कारवाई केली जाते. असे प्रकार सुरू असल्यास निश्चितच कारवाई केली जाणार आहे.
पुरुषोत्तम निकम, उपायुक्त, परिवहन विभाग

---------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai News Share rickshaw taxi drivers breaking covid 19 rule

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com