शशी कपूर यांना अखेरचा निरोप

शशी कपूर यांना अखेरचा निरोप

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच रंगभूमीवरही आपल्या अभिनयाचा अविस्मरणीय ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अख्खे कपूर कुटुंब तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. आपल्या या लाडक्‍या अभिनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी शशी कपूर यांचे चाहतेही भर पावसात मोठ्या संख्येने आले होते. सगळ्यांना शोक अनावर झाला होता.

सोमवारी (ता. ४) सायंकाळी शशी कपूर यांचे दीर्घ आजाराने अंधेरीतील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले. हे कळताच हिंदी चित्रपटसृष्टीतील कित्येक कलाकारांनी लगेच रात्री त्यांच्या घरी जाऊन कपूर कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. मंगळवारी सकाळी १०.३०च्या सुमारास शशी कपूर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी जुहू येथील पृथ्वी थिएटरमध्ये आणण्यात आले. तिथेही काही मान्यवरांनी आणि चाहत्यांनी अंत्यदर्शन घेतले. साधारण ११.३० ते १२च्या सुमारास शशी कपूर यांचे पार्थिव सांताक्रूझ येथील शास्त्रीनगरमधील स्मशानभूमीत शववाहिकेतून आणण्यात आले. त्यानंतर सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शशी कपूर यांचा मुलगा करण याने अंत्यविधी केला. अखेरची मानवंदना देण्यासाठी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरीही झाडल्या. या वेळी चोख पोलिस बंदोबस्त होता. 

अंत्यदर्शन घेण्यासाठी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, शाहरूख खान, श्‍याम बेनेगल, राकेश ओमप्रकाश मेहरा, पूनम धिल्लाँ, सैफ अली खान, टीनू आनंद, रोहित रॉय, सुमित राघवन, सचिन पिळगावकर, अब्बास-मस्तान, मुकेश ऋषी, लारा दत्ता, श्रद्धा कपूर, शक्ती कपूर, संवादलेखक सलीम खान, कोरिओग्राफर फराह खान, रजा मुराद, नंदिता दास आदी अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com